
थेट WhatsApp वर मिळवा
ऑक्टोबर महिन्यातील वाढत्या तापमानामुळे डिहायड्रेशन आणि त्वचेच्या समस्या वाढल्या असून नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य तज्ज्ञांनी केले आहे.
स्थैर्य, सातारा , दि. ०३ ऑक्टोबर : मान्सूनच्या परतीनंतर राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा कडक चटका जाणवू लागला आहे. वेगाने वाढणारे तापमान आणि हवेतील आद्रतेमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन डिहायड्रेशन, उष्माघात आणि त्वचेचे विकार उद्भवण्याचे प्रमाण वाढले आहे. अचानक झालेल्या हवामान बदलामुळे बालके, वृद्ध आणि घराबाहेर काम करणाऱ्या नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर उन्हाच्या तडाख्यापासून बचाव करण्यासाठी आरोग्याची आणि त्वचेची विशेष काळजी घेण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
डिहायड्रेशन टाळण्यासाठी जलसंजीवनीचा वापर करा
उन्हाचा पारा चढल्याने शरीरातून मोठ्या प्रमाणावर घामाच्या वाटे पाणी आणि क्षार बाहेर पडतात. यामुळे थकवा, चक्कर येणे आणि डोकेदुखी यांसारखे त्रास डोके वर काढतात. हे टाळण्यासाठी दिवसातून किमान ८ ते १० ग्लास पाणी पिणे अत्यंत गरजेचे आहे. याशिवाय नारळ पाणी, ताक, लिंबू पाणी आणि ताजी फळे यांचा आहारात समावेश करावा. उन्हात बाहेर पडताना अंगात सुती आणि हलक्या रंगाचे कपडे वापरावेत, तसेच थेट सूर्यप्रकाशापासून बचावासाठी छत्री अथवा टोपीचा वापर करावा.
त्वचेची काळजी घेणे आवश्यक
उन्हाच्या तीव्र किरणांमुळे त्वचा काळी पडणे, कोरडी होणे, रॅशेस उठणे आणि पिंपल्स येणे अशा समस्या निर्माण होतात. त्यामुळे घराबाहेर पडण्यापूर्वी सनस्क्रीन लोशन लावणे फायदेशीर ठरते. तसेच चेहरा स्वच्छ धुवून हलक्या मॉइश्चरायझरचा वापर करावा. उन्हाच्या काळात तळलेले, तिखट आणि मसालेदार पदार्थ खाणे टाळावे, जेणेकरून शरीरातील उष्णता नियंत्रणात राहण्यास मदत होईल.



