हिवाळ्यात शरीराला ऊर्जा देणारे खमंग डिंकाचे लाडू; जाणून घ्या घरच्या घरी बनवण्याची अचूक रेसिपी

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

हिवाळ्यात शरीराला ऊब आणि ताकद देणारे भरपूर दिवस टिकणारे डिंकाचे लाडू घरच्या घरी कसे बनवायचे, याचे योग्य प्रमाण आणि सोपी कृती जाणून घ्या.

स्थैर्य, सातारा, दि. १९ नोव्हेंबर : थंडीच्या दिवसांत शरीराला उष्णता आणि पोषण मिळण्यासाठी घराघरांत पौष्टिक लाडू बनवण्याची लगबग सुरू होते. डिंक, खारीक, सुकामेवा, सुके खोबरे आणि गुळापासून तयार केलेले डिंकाचे लाडू चवीला खमंग आणि पोटभरीचे असतात. साखरेऐवजी गुळाचा वापर करून बनवलेले हे लाडू योग्य पद्धतीने साठवून ठेवल्यास अनेक दिवस टिकतात, त्यामुळे लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांसाठी हा उत्तम पौष्टिक पर्याय ठरतो.

लाडू बनवण्यासाठी लागणारे योग्य प्रमाण

डिंकाचे लाडू खमंग होण्यासाठी १०० ग्रॅम डिंक, अर्धा कप साजूक तूप, प्रत्येकी ५० ग्रॅम बदाम, काजू व बेदाणे, दोन कप खारीक, तीन कप किसलेले सुके खोबरे आणि दोन मोठे चमचे खसखस आवश्यक असते. याशिवाय चवीसाठी एक चमचा वेलची पूड, एक चमचा सुंठ पूड, जायफळाचा छोटा तुकडा आणि तयार मिश्रणाच्या प्रमाणानुसार गूळ घ्यावा लागतो. सर्व जिन्नस योग्य प्रमाणात घेतल्यास लाडू अजिबात कडक किंवा अतिगोड होत नाहीत.

लाडू तयार करण्याची सोपी कृती

सर्वप्रथम कढईत साजूक तूप गरम करून मंद आचेवर थोडा थोडा डिंक छान फुलेपर्यंत तळून घ्यावा आणि थंड झाल्यावर वाटी किंवा हाताने जाडसर कुस्करून घ्यावा. त्यानंतर उरलेल्या तुपात बदाम, काजू आणि बेदाणे हलके भाजून त्यांची जाडसर पूड करावी, तसेच बिया काढलेली खारीक तुपात परतून मिक्सरमधून बारीक दळून घ्यावी. सुके खोबरे आणि खसखसही मंद आचेवर सोनेरी होईपर्यंत भाजून थंड झाल्यावर या सर्व मिश्रणात वेलची पूड, सुंठ पूड, जायफळ आणि योग्य प्रमाणात गूळ एकत्र करून खमंग लाडू वळावेत.

 

 

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!