अवतीभोवतीच्या निरीक्षणातून कथा व कवितांचे बीज मिळते : रवींद्र बेडकिहाळ

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.२७ जानेवारी २०२२ । फलटण । आपल्या अवतीभोवतीचे निरीक्षण, घरात व बाहेरही संवेदनशील मन यातूनच कथा कवितांचे बीज आपल्याला मिळत असते. त्याचा योग्य, समर्पक शब्दात वापर करुन नवलेखकांनी आपले साहित्य जीवनाभिमुख व कसदार होण्यासाठी प्रयत्न करावा. तसेच नवलेखकांनी उत्तमोत्तम विविध प्रकारच्या साहित्यांचे वाचन करुन आपले लेखन समृद्ध करावे, अशी अपेक्षा महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य रविंद्र बेडकिहाळ यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आणि साहित्यप्रेमी सेवाभावी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त येथील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर सभागृहात आयोजित नवोदित लेखकांसाठी कथालेखन कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभात अध्यक्षस्थानावरुन बेडकिहाळ बोलत होते. या कार्यशाळेचे उद्घाटन कृषि उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष भगवानराव होळकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी व्यासपीठावर बाजार समितीचे संचालक प्रकाश भोंगळे, ज्ञानदीप शिक्षण संस्थेचे अध्यक्ष एम. डी. ढोबळे व साहित्यप्रेमी सेवाभावी फाऊंडेशनचे अध्यक्ष ताराचंद्र आवळे उपस्थित होते.

मराठी भाषेचे संवर्धन व समृद्धी यासाठी साहित्य क्षेत्रातील सर्वच लहानमोठ्या संस्थांनी मराठी भाषाविषयक साहित्याशी संबंधित संस्थांचे कार्य सामान्य जनतेपर्यंत पोचवावे. यासाठी अशा कार्यशाळांची निश्‍चितच उपयुक्तता आहे’’, असे सांगून बेडकिहाळ म्हणाले, ‘‘लेखन व वाचन संस्कृती संवर्धन, विविध विषयांवरील संशोधनात्मक पुस्तकांचे प्रकाशन, विविध कार्यशाळा, मराठी साहित्य संमेलन यासाठी सातत्याने प्रोत्साहन देण्याचे सक्रीय कार्य साहित्य व संस्कृती मंडळाकडून केले जाते.

उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक करताना संयोजक संस्थेचे अध्यक्ष ताराचंद्र आवळे यांनी सांगितले की, ‘‘राज्य साहित्य व संस्कृती मंडळाने दिलेल्या संधीमुळे नवोदित लेखकांसाठी ही कथालेखन कार्यशाळा सातारा जिल्ह्यात प्रथमच घेण्याची संधी आमच्या संस्थेला मिळाली. यातून निश्‍चितपणे नवोदित कथालेखक तयार होतील. या कार्यशाळेत सहभागी झालेल्या नवलेखकांनी आपली कथा आमच्याकडे पाठवून द्यावी. या सर्व कथांचा कथा संग्रह आम्ही संस्थेतर्फे प्रकाशित करु.

भगवानराव होळकर, प्रकाश भोंगळे, मोहनराव डांगे यांनीही या साहित्यिक उपक्रमाचे स्वागत करुन आपल्या भाषणात सांगितले की, ‘‘सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली इथून पुढेही अशा साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना कृषि उत्पन्न बाजार समितीतर्फे सर्वतोपरी सहकार्य केले जाईल.

दुस-या सत्रात अभिजात मराठी याविषयांवर व्याख्याते भारत घोडके यांनी मराठी भाषेची थोरवी सांगून तिच्यावर अनेक आक्रमणे झाली तरी ती जगात कशी श्रेष्ठ व अभिजात आहे याची समर्पक उदाहरणे दिली.यावेळी व्यासपिठावर सामजिक कार्यकर्ते, साहित्यप्रेमी डॉ.अजित दडस व मसाप फलटण शाखेचे अध्यक्ष प्राचार्य शांताराम आवटे उपस्थीत होते.

तिस-या सत्रात नवोदित लेखकांसाठी कथालेखन कार्यशाळा संपन्न झाली यावेळी ज्येष्ठ साहित्यिक,सर्ज्याकार सुरेश शिंदे व सौ सुलेखा शिंदे यांनी कथा कशी जन्माला येते त्याचे मूळ कशात आहे तसेच कथालेखक यांनी संवेदनशील मनाचे रेखाटन केले तर कथेचा दर्जा कसा अधिक सुधरतो यावर भाष्य करुन कथा कशी लिहावी आरंभ ते समारोप याचे याचे मुद्देसूद मार्गदर्शन केले.यावेळी कथाकथनकार शत्रुघ्न जाधव यांनी माणदेशी कथा सादर करुन कथा सादरीकरण व लेखन याचे मार्गदर्शन केले.यावेळी व्यासपिठावर संयोजन संस्थेच्या सदस्य सौ सुरेखा आवळे व सौ चैताली चव्हाण उपस्थीत होते.चौथ्या समारोपाच्या सत्रात ज्येष्ठ व्याख्याते प्राचार्य रविंद्र येवले यांनी कथालेखक यांनी कसे भावनाप्रधान असावे व छोट्या छोट्या प्रसंगातून कशा कथा निर्माण होतात याची सादरीकरणासह उत्तम उदाहरणे दिली.यावेळी व्यासपिठावर मसाप फलटण शाखेचे कार्याध्यक्ष महादेव गुंजवटे व संस्थेचे कोषाध्यक्ष आबा आवळे उपस्थीत होते.प्रा.दशरथ जाधव यांनी प्राथिनीधीक स्वरूपात नवकथालेखक यांचेवतीने मनोगत व्यक्त केले.

संयोजक संस्थेचे उपाध्यक्ष अविनाश चव्हाण यांनी पाहुण्यांचा परिचय करुन प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक बल्लाळ व कु.प्रतिक्षा कांबळे यांनी केले तर आभार संयोजक संस्थेचे सचिव राजेश पाटोळे यांनी मानले.सातारा,पुणे, सोलापुर,सांगली या जिल्यातून नवकथालेखक उपस्थित होते. कार्यक्रमास साहित्यप्रेमी सेवाभावी फाऊंडेशनचे सदस्य,सहित्यप्रेमी व नवकथालेखक उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!