पदवीधर मतदारसंघासाठी बैठक व मार्गदर्शन मेळावा
स्थैर्य, सातारा, दि. ३१ : पदवीधर मतदारसंघासाठी पश्चिम महाराष्ट्रात 55हजार मतदार नोंदणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. युवक जोपर्यंत पुढे येत नाही तोपर्यंत कोणत्याही पक्षाला यश मिळणार नाही भविष्यकाळात भारतीय युवा मोर्चाला मोठी संधी असून युवकांना सोबत घेऊन संघटना मजबूत, बळकट करण्यावर आपला भर राहील, अशी माहिती भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हॉटेल प्रीती एक्झिक्युटीव्हमध्ये पदवीधर मतदारसंघासाठी बैठक व मार्गदर्शन मेळावा झाल्यानंतर ते प्रसिद्धिमाध्यमांशी बोलत होते.विक्रांत पाटील पुढे म्हणाले, भाजप युवा मोर्चाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या आत्मनिर्भर भारत या योजनेचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना मिळावा यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्यात येत आहेत. नजीकच्या काळात आत्मनिर्भर भारत युवा केंद्र सुरु करण्याचा मानस आहे. आजपर्यंत भाजपाने नेहमीच लोकांना संधी दिली आहे. १०५ आमदारांमध्ये ६० ते ७० आमदार युवक आहेत. सध्या भाजप युवा मोर्चाने पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले असून कालपासूनच वाई दौऱ्याला सुरुवात केली आहे. आज सातारा येथे सातारा शहर, ग्रामीण, जावली आणि कोरेगाव अशा तीन मंडलाची बैठक घेण्यात आली. त्यामध्ये पदवीधर मतदार संघासाठी युवक मतदारांची नोंदणी करणे हा प्रमुख अजेंडा आहे. ज्या युवकांनी पदवीधर मतदार संघासाठी नावे नोंदवली नाहीत, त्यांची नावे नोंद करून घेण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. पदवीधर मतदारसंघासाठी पश्चिम महाराष्ट्रात सातारा सांगली कोल्हापूर या तीन जिल्ह्यात 55हजार मतदार नोंदणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. सुनिल मेंगडे, अनुप मोरे, निलेश नलावडे, अक्षय मोरे, सुशांत गाडे यावेळी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे कट्टर समर्थक, कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे विधान परिषद आ. शशिकांत शिंदे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळख असणाऱ्या ऍड. नितीन भोसले यांनी भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांचा बुके देऊन सत्कार केला. पाटील यांची पत्रकार परिषदे संपेपर्यंत ते उपस्थित होते. त्यांच्या या उपस्थितीमुळे भाजप कार्यकर्त्यांच्या भुवया चांगल्याच उंचावल्या होत्या. गेली अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून काम करणारे नितीन भोसले अलीकडच्या काही काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्यासपीठावर अथवा राष्ट्रवादी भवनमध्ये दिसून येत नाहीत.