दैनिक स्थैर्य । दि. १२ जानेवारी २०२३ । मुंबई । रस्ते वाहतूक नियमांचे पालन करीत शिस्तबद्ध वाहने चालविल्यास अपघातांचे प्रमाण कमी होईल. अपघाताचे ठिकाण निश्चित करून त्या ठिकाणी जनजागृतीसाठी विशेष मोहीम राबवावी. रस्ता सुरक्षा ही अत्यंत महत्त्वाची आहे. वाहतुकीचे नियम पाळणे ही सामूहिक जबाबदारी आहे. नागरिकांमध्ये जनजागृती करून अपघाताचे प्रमाण कमी होण्याचे उद्दिष्ट ठेवून काम करावे, असे प्रतिपादन राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
राज्य रस्ता सुरक्षा अभियान २०२३ चे उद्घाटन मंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते आज मुंबईत एनसीपीए सभागृह, नरिमन पॉईंट येथे करण्यात आले. त्यावेळी मंत्री श्री. देसाई बोलत होते. या कार्यक्रमास परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन नैनोटिया, मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर, अपर पोलिस महासंचालक (वाहतूक) कुलवंत सारंगल, पोलीस सह आयुक्त (वाहतूक) प्रवीण पडवळ, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक संजय यादव, जेष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ आदी उपस्थित होते.
मंत्री श्री. देसाई म्हणाले, परिवहन विभागामार्फत राज्य रस्ता सुरक्षा अभियानाला आजपासून सुरुवात झाली आहे. १७ जानेवारी २०२३ पर्यंत रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येईल. विविध नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृती करावी. नागरिकांना शिस्त लागणे व अपघाताचे प्रमाण कमी होणे उद्दिष्ट असून दंडाची वसुली करणे हे शासनाचे उद्दिष्ट नाही.
मुलांना शालेय जीवनापासून वाहतुकीचे नियम शिकवले गेले पाहिजेत, शाळा महाविद्यालयांमध्ये ज्या पालक आणि शिक्षक सभेत परिवहन विभागामार्फत रस्ता सुरक्षा विषयक मार्गदर्शन करावे. परिवहन विभागामार्फत अनेक सुविधा ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहेत. ही कौतुकास्पद बाब आहे. वाहतूक नियमांचे पालन करुन प्रवास करताना वेग मर्यादा आणि वेळ मर्यादा पाळली पाहिजे.
सात फेसलेस सेवांचे लोकार्पण
मोटार वाहन विभागामार्फत 58 सेवांपैकी 18 सेवा यापूर्वीच फेसलेस देण्यात येत आहेत. आज राज्य उत्पादन शुल्क मंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते नवीन सात सेवांचे लोकार्पण करण्यात आले. यामध्ये वाहनांकरिता विशेष परवाना, वाहनांकरिता तात्पुरता परवाना, दुय्यम योग्यता प्रमाणपत्र, दुय्यम शिकवू अनुज्ञप्ती, शिकाऊ अनुज्ञप्तीवरील पत्ता बदल, वाहक अनुज्ञप्तीवरील पत्ता बदल, धोकादायक माल वाहने चालविण्यास मान्यता या सेवा आजपासून सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे एकूण 25 सेवा फेसलेस सुरू झाल्या आहेत.
यावेळी मागील वर्षाच्या तुलनेत अपघातामध्ये लक्षणीय घट होण्यासाठी विशेष प्रयत्न केलेल्या मुंबई शहर आणि उपनगर, नंदुरबार, अकोला या जिल्ह्यांच्या रस्ता सुरक्षा समिती सदस्यांचा सत्कार करण्यात आला. मुंबई शहर आणि उपनगर 27 टक्के, नंदुरबार 18 टक्के, अकोला 16 टक्के अपघातांचे प्रमाण कमी झाले आहे.
अपघातांचे विश्लेषण करणारी मार्गदर्शिका आणि वेस्टन इंडिया ऑटोमोबाईल असोसिएशनच्या रस्ता सुरक्षा वार्षिक दिनदर्शिकेचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. तसेच अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या जीवनदूत (Good samaritan), रस्ता सुरक्षा क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, सामाजिक बांधिलकी ठेवणाऱ्या कर्तव्यदक्ष अधिकारी, कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.