ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी फलटणमध्ये समाजाचा एल्गार; तासभर ‘रास्ता रोको’ करत सरकारला दिला इशारा


मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या, पण ओबीसी कोट्यातून नको; आंदोलकांची एकमुखी मागणी

स्थैर्य, फलटण, दि. १ सप्टेंबर : “मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास आमचा ठाम विरोध असून, आमच्या हक्काच्या आरक्षणाला धक्का लावल्यास राज्यव्यापी तीव्र आंदोलन उभारू,” असा खणखणीत इशारा फलटण तालुक्यातील ओबीसी समाजाने दिला आहे. मुंबईत सुरू असलेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, आज फलटण येथील नाना पाटील चौकात ‘रास्ता रोको’ आंदोलन करत ओबीसी बांधवांनी आपली एकजूट दाखवली. यावेळी पुणे-पंढरपूर महामार्गावरील वाहतूक तब्बल एक तास रोखून धरण्यात आली होती.

या आंदोलनादरम्यान, “आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे,” “ओबीसींवर अन्याय, आता सहन होणार नाही,” अशा गगनभेदी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. आंदोलकांनी स्पष्ट केले की, “आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही, मात्र त्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण देऊ नये. सरकारने तातडीने जातनिहाय जनगणना करून त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावे.” बोगस कुणबी नोंदींच्या आधारे प्रमाणपत्रे देण्याचा प्रकार तात्काळ थांबवावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

आंदोलनानंतर शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांना सादर केले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस निरीक्षक श्री. हेमंतकुमार शहा यांच्या नेतृत्वाखाली शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या आंदोलनामुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र आंदोलन शांततेत पार पडले.


Back to top button
Don`t copy text!