दैनिक स्थैर्य । दि.०२ एप्रिल २०२२ । फलटण । महाविद्यालयीन युवक-युवतीं मध्ये श्रम-संस्कार करण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्वाचे योगदान राहिले आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबीरा मध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना जो अनुभव येतो तो अनुभव त्यांच्या भावी जीवनासाठी एक दिशा देणारा असतो, असे प्रतिपादन फलटण- कोरेगाव मतदार संघाचे आमदार मा. दीपकराव चव्हाण यांनी केले. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व मुधोजी महाविद्यालय फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने ‘माझी वसुंधरा अभियान प्रेरित’ या घोष वाक्याखाली राष्ट्रीय सेवा योजनेचे ५० वे विशेष श्रमसंस्कार शिबीर मौजे काळज तालुका फलटण या ठिकाणी संपन्न झाले. या शिबीराच्या समारोप समारोहाचे प्रमुख पाहुणे म्हणून मा. आमदार दीपकराव चव्हाण उपस्थित होते. समारोहाचे अध्यक्ष फलटण एज्युकेशन सोसायटी चे प्रशासन अधिकारी मा. प्राचार्य अरविंद निकम सर हे होते.
याप्रसंगी उपस्थित स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना मा. आमदार दीपकराव चव्हाण पुढे असे म्हणाले की, अशा प्रकारच्या शिबीरांमधून आपल्यावर जे श्रम-संस्कार होतात ते आपल्या भावी आयुष्यात खूप उपयोगी पडतात. या संस्कारां मधूनच आपले व्यक्तिमत्व घडत असते. ही श्रमाची शिदोरी आपणाला भावी जीवनामध्ये उपयोगी पडते. ज्या विद्यार्थ्यांवर श्रमाचे संस्कार होतात ते विद्यार्थी आपल्या भावी जीवनात नेहमीच यशस्वी होतात. आजच्या नवीन पिढीमध्ये कुठेतरी शारीरिक श्रम न करण्याची वृत्ती वाढत चाललेली दिसते. अशावेळी श्रमाचे महत्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. आपण जर यशस्वी माणसांचा इतिहास पाहिला तर अनेक क्षेत्रात जी माणसे यशस्वी झाली, त्यांच्या यशामागे त्यांनी घेतलेले कष्ट व त्यांचे श्रम आहेत हेच दिसून येते. आपण जरी ग्रामीण भागातील विद्यार्थी असलो तरी जर आपण प्रामाणिकपणे परिश्रम घेतले तर नक्कीच आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. फलटण एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून फलटण तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी आधुनिक काळानुरूप उच्चशिक्षणाची जी सोय उपलब्ध करून दिली आहे, त्याचा विद्यार्थ्यांनी अधिक लाभ घ्यावा. स्पर्धा परीक्षांमध्ये देखील आपले ग्रामीण विद्यार्थी आता यशस्वी होत आहेत. आपणही त्या दृष्टीने प्रयत्न केला तर नक्कीच आपणाला यश मिळेल.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. प्राचार्य अरविंद निकम सर हे आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, महाविद्यालयातील सर्वच विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरामध्ये सहभागी होता येत नाही, म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेले विद्यार्थी हे माझ्या दृष्टीने नशीबवान आहेत. मुधोजी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या या विभागाला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेला आहे. आणि अशा या विभागाशी आपण सर्व स्वयंसेवक जोडले गेला आहात. यादृष्टीने आपणा सर्वांची ही फार मोठी जबाबदारी आहे की महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाची जी एक उज्वल परंपरा आहे, ती आपण सर्वांनी यापुढेही राखली पाहिजे. मनापासून केलेले कामच आपल्याला आनंद देते. मन, मेंदू व मनगटाचा योग्य वापर कसा करायचा ते या ठिकाणी शिकविले जाते. शरीरात उत्पन्न होणाऱ्या ऊर्जेला एक वाट करून देण्याचे काम अशा प्रकारच्या श्रम-संस्कार शिबीरांमधून होते. शिबीरामध्ये स्वयंसेवकांनी जे श्रमदान केले, त्याबद्दल त्यांनी सर्वांचे अभिनंदन करून विद्यार्थ्यांना सांगितले की या शिबीरातील आठवणी ह्या तुम्हाला तुमच्या भावी जीवनात खूप समाधान देतील.
महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पंढरीनाथ कदम यांनी शिबीरामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी शिस्ती संदर्भात केलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन केल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक केले. विद्यार्थ्यांनी केलेल्या श्रमदाना मधून व आपल्या आचरणातून ग्रामस्थांपुढे जो एक आदर्श प्रस्तुत केला तो निश्चितच अभिनंदनीय आहे. ते पुढे असेही म्हणाले की या शिबीरामध्ये विद्यार्थ्यांवर जे संस्कार झाले आहेत ते एवढ्यापुरतेच मर्यादित न राहता, तुमच्या प्रत्येक ठिकाणच्या आचरणातून प्रकट झाले पाहिजेत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा. मदन पाडवी यांनी केले. आपल्या प्रास्ताविकामध्ये त्यांनी शिबीराच्या सात दिवसांमध्ये काळज ग्रामस्थांकडून शिबीर यशस्वी करण्यासाठी जे सहकार्य लाभले त्याचा उल्लेख करून शिबीरामध्ये जे विविध उपक्रम राबवले त्याविषयी माहिती दिली. शिबीरामध्ये सहभागी स्वयंसेवकांनी उत्स्फूर्तपणे सर्व उपक्रमांमध्ये सहभाग घेऊन हे शिबीर यशस्वी केले, त्याबद्दल त्यांनी सर्वांचे कौतुक केले. पर्यावरण संवर्धन, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, प्रबोधनात्मक व्याख्याने व सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी उपक्रमांचा आपल्या प्रास्ताविकामध्ये त्यांनी आढावा घेतला. बेस्ट व्हालिंटियर म्हणून कु. पवार निकिता रमेश व श्री रिटे कृष्णा वसंत या विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी शिबीरामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांमधून प्रातिनिधिक स्वरूपात श्री दादा वाघमोडे व कु. श्वेता दरवडे यांनी आपले अनुभव सांगितले. तसेच ग्रामस्थांमधून सुद्धा श्री मोहिते सर व सौ. प्रतिभा गाढवे यांनी प्रातिनिधिक स्वरूपात शिबीरा संबंधी प्रतिक्रिया व्यक्त करून शिबीरामध्ये राबविल्या गेलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक केले.
याप्रसंगी शिबीराचे यशस्वीपणे आयोजन केल्याबद्दल काळज गावच्या ग्रामस्थांकडून एन. एस. एस. चे कार्यक्रम अधिकारी प्रा. मदन पाडवी, प्रा. डॉ. सौ. सविता नाईक-निंबाळकर व एन. एस. एस. समितीतील सर्व सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्र-संचालन कु. प्रिया बाळासो जाधव या विद्यार्थिनीने केले. कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांचे आभार प्रा. संतोष कोकरे यांनी मानले. या समापन समारोहासाठी काळज गावचे सरपंच मा. श्री संजय गाढवे, उपसरपंच मा. सौ. संगीता देशमुख, मुधोजी महाविद्यालय विकास समितीचे सदस्य डॉ. बाळासाहेब कांबळे, डॉ.सौ. सरिता माने, डॉ. प्रभाकर पवार, डॉ. अनिल टिके, डॉ. नवनाथ रासकर, प्रा. ज्योत्स्ना बोराटे. डॉ. अशोक जाधव, डॉ. नितीन धवडे, डॉ. स्वप्नील पाटील, प्रा. सौ. सीता जगताप, प्रा. सचिन लामकाने, प्रा. एस. डी. पवार तसेच अन्य प्राध्यापक वृंद व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.