स्थैर्य, सातारा, दि.४: संरक्षणमंत्री राजनाथसिंह शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीसाठी रशियाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी एके ४७-२०३ रायफलची भारतात निर्मिती करण्यासाठी रशियाशी एक करार केला आहे. रशियाच्या माध्यमांनी कराराला अंतिम रूप मिळाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. एके ४७-२०३ ही एके-४७ रायफलची नवीन आणि सर्वात आधुनिक आवृत्ती आहे. ती इंडियन स्माॅल आर्म्स सिस्टिम (इन्सास) ५.५६ बाय ४५ मिमी असाॅल्ट रायफलची जागा घेणार आहे.
आजघडीस भारतीय सैन्याला सुमारे ७ लाख ७७ हजार एके ४७-२०३ रायफल्सची गरज आहे. त्यापैकी १ लाख आयात केल्या जातील, तर उर्वरित भारतात तयार होतील. संरक्षण क्षेत्रातील तज्ञांच्या मते ही रायफल पर्वतीय भागातील सैनिकांसाठी उपयुक्त आहे.