आता जिल्ह्यातील गुंडाना समजेल अश्याच भाषेत उत्तर देणार : श्रीमंत रामराजे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०४ ऑक्टोबर २०२२ । फलटण । सातारा जिल्ह्याला एक सुसंस्कृत अशी परंपरा आहे. सातारा जिल्ह्यामध्ये गेल्या काही वर्षांपासून गुंड प्रवृत्ती कार्यरत आहेत. एकेकाळी पृथ्वीराज चव्हाण यांचे अत्यंत विश्वासू असे समजले जाणाऱ्या ह्या दोघांनी त्यांचा विश्वासघात केला. ह्यांच्या पेक्षा ह्यांचे वडील हिंदुराव नाईक निंबाळकर परवडले, परंतु हे नाही. आता आगामी काळामध्ये कार्यरत असताना ह्या गुंडांना समजेल अश्याच भाषेमध्ये आपण उत्तर देणार आहोत. फलटणच्या खासदारांनी त्यांचा कारखाना उपळवे येथून हलवून म्हसवडला नेहून चालवून दाखवावा, असे मत आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या फलटण येथील संपर्क मेळाव्यात आमदार श्रीमंत रामराजे बोलत होते. यावेळी सिक्कीमचे माजी राज्यपाल व खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे, दीपक चव्हाण, जिल्हाध्यक्ष सुनील माने, जेष्ठ नेते सुभाष शिंदे, श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर – निंबाळकर, युवकचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

आता काही जण म्हणत आहेत कि रामराजेंच्या पाठीमागे आता ईडी लागू शकते, पण ह्या नेत्यांनी एक लक्षात ठेवले पाहिजे कि तुमच्याकडे ईडी आहे तर माझ्याकडे सीडी आहे. आणि तेसुद्धा फक्त एक सीडी नसून अश्या अनेक सीडीज माझ्याकडे आहेत. तुम्ही बोलताना सुद्धा जपून बोलले पाहिजे. माझ्या विरोधात बोलत असतील तर मला काहीच वाटत नाही, परंतु जर माझ्या कार्यकर्त्यांच्या विरोधात बोलून त्यांना धमकी देत असाल तर मी शांत बसणार नाही. तुम्हाला तुमच्या भाषेत उत्तर देण्यास मी सक्षम आहे, असे यावेळी आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

आपले खासदार व त्यांचे मित्र यांचे आपल्या तालुक्यावर विशेष लक्ष आहे. चिमणराव कदम यांचे व माझे, कृष्णचंद्र भोईटे यांच्यासोबत संघर्ष झाले. परंतु बाहेरचे कोणीही तालुक्यात आणले नाहीत. आमच्या कार्यकर्त्यांची प्रेस होणार होती परंतु त्यांच्या कार्यकर्त्यांकडून तुम्हाला त्रास होईल. तुम्हाला मोक्का लावेन. असे निरोप आले. आता हल्ली अलीकडच्या काळामध्ये सातारा जिल्हा असो किंवा यांचा मतदारसंघ असो जर गोरेच सगळं करत असतात तर खासदार गोरेंची बॅग घेवुन फिरतात का ? असा टोलाही यावेळी आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी लगावला.

मोदी साहेबांच्या मनात फलटण तालुक्याचं वाटोळ व्हावं असे वाटत नाही. मुळची भाजपा आता जिल्ह्यात राहिली नाही. काँग्रेसमध्ये असताना आनंदराव पाटील यांना बाहेर काढण्याचे काम ह्या दोघांनी केले. पक्ष सोडून इतर पार्टीतुन घेण्याचे काम ह्यांचे काम केले. हे माढ्यातून खासदार झाले ते फक्त विजयसिंह मोहिते – पाटील यांच्यामुळेच झाले. शंभरच्या वर यांचे कार्यकर्ते असतील असं कुणालाही वाटत नाही. कार्यकर्त्यांच्या नावावर कर्ज घेवुव त्या कार्यकर्ताला आपल्याकडे ठेवण्याचे काम खासदार करत असतात असे यावेळी आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

एमआयडीसीचा जो प्रकल्पाचा प्रश्न आहे तो फक्त कोरेगाव किंवा माण तालुक्याचा प्रश्न नाही, तर सातारा जिल्ह्याचा प्रश्न आहे. त्यांच्याच केंद्र सरकारने हा प्रकल्प कोरेगावला करावा असे निर्देश दिले आहे. यांच्या उपळवे येथील कारखान्यात एकही एमडी टिकत नाही. ह्या खासदारांच्या वडिलांना म्हणजेच हिंदुराव यांना नागपुरला ॲटेक आला होता त्यावेळी मी व आमदार दीपक चव्हाण यांनी सांभाळल. त्यावेळी जवळपास पाच दिवसांनी हे तिथे आले होते. तुमच्या हिंदुत्वाच्या व्याख्येत हे बसतं का ? खरंच तुम्ही श्रावण बाळ आहात का ? असेही यावेळी आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

सध्या भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष कोळकीचे आहेत, आता त्यांच्याकडे बघायचं आहे. आमचे शत्रुत्व घरापर्यंत पोहचलो नाही. तीस वर्षे आम्ही आमच्या कुटुंबाकडे बघीतले नाही. ह्या वेळेसची आपली निवडणूक वेगळी होणार आहे. सन १९९९ च्या ताकदीने ही निवडणूक होणार आहे. तरुणांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कामकाज माहित असणे गरजेचे आहे. शरद पवार यांनी तालुक्यात प्रत्येक कारखान्याला मदत केली आहे. आपल्या विरोधात असणाऱ्या कारखान्याला सुद्धा त्यांनी मदत केली आहे, असे आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

ज्या दहा तोडांच्या रावणाला ज्याने हरिवलं त्याचे नाव श्रीराम आणि फलटणकरांना ह्या पिढीत जन्मताच राम दिला आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्यांनी सर्व खजिना हा सरकारला दिला, ज्या कोयन्याच्या विजेवर राज्य चालतंय त्या मालोजीराजेंचा नातु आज ह्या फलटणचं नेतृत्व करतोय. त्याच्या पाठीशी फलटणकर उभे आहेत. आता आपण सर्व जण विचाराने एक होवून विकासाच्यासोबतच राहिले पाहिजे. फलटण तालुका बागायती करण्याचे काम रामराजेंचे केले. बारामती व फलटणचं जुनं नातं आहे. रामराजेंनी राष्ट्रवादीचे सातारा जिल्ह्याचे नेतृत्व करत आहेत. त्यांचा सांगावा आल्यावर आम्ही सरदार लगेचच येणार आहोत. साताराचा बालेकिल्ला हा अभ्येदच राहणार आहे, असे यावेळी खासदार श्रीनिवास पाटील यांनी स्पष्ट केले.

एकादी निवडणूक आल्यावर जनतेसमोर व पक्ष कार्यकर्तांच्यासमोर जावुन पक्षाची धोरणे व कामकाजाची माहिती देणे गरजेचे आहे. फलटण तालुक्यात रामराजेंच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत पासुन ते विधानसभेपर्यंत सर्व ठिकाणी सत्ता राष्ट्रवादीचीच आहे. धोम बलकवडी व निरा उजवा कॅनोलच्या माध्यमातून फलटण तालुका हा बागायती करण्याचे काम रामराजेंनी केले. कोरोना काळात राज्याचा गाडा सुनियोजित पणे हाकायचे काम अजित दादा पवार यांनी केले. आताच्या सरकारचे सामान्य माणसाकडे लक्ष नाही. आपल्याला आपले पक्ष संघटन वाढवणे गरजेचे आहे. पक्षाची धोरणे सांगण्यापेक्षा जनतेसाठी काय केले, हे करणे गरजेचे आहे. जनतेत ह्या सरकारच्या विरोधात भावना आहे, म्हणूनच निवडणुका पुढे ढकलण्याचे काम हे सरकार करत आहे, असे यावेळी आमदार बाळासाहेब पाटील यांनी स्पष्ट केले.

आजच्या मेळाव्याने रावणाचा दहन करून राष्ट्रवादीचा विचार तळागाळात पोहचवणे गरजेचे आहे. रामराजेंनी जिल्ह्याच नेतृत्व कराव, आम्ही सर्व जण रामराजेंच्यासोबत आहे. सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे व तो बालेकिल्लाच राहणार. पक्ष स्थापन झाल्यापासून निवडणुकीत सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेस सोबतच आहे. रामराजेंचा अंत व अंदाज आम्हाला सुध्दा आला नाही. पवार साहेबांच्या प्रमाणे रामराजे बोलतात एक व करतात एक. रामराजे सभापती असताना आमचं फिक्सिंग असायचं. आता पुढच्या काळामध्ये रामराजेच सभापती होणार आहेत. आम्ही निष्ठावंत आहोत, शेवट पर्यंत शरद पवार म्हणजे शरद पवार म्हणूनच निष्ठावंत राहणार आहोत, असे यावेळी आमदार शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केले.

आमच्या सरकारच्या काळात दिलेली बारा नावे दिली नाहीत सरकार बदलली. हल्ली कोर्टावर सुध्दा नागरिकांचा विश्वास राहिला नाही. बारा आमदार भरले नाहीत तर रामराजेच विधानपरिषदेचे सभापती होणार आहेत. जनता पेटून उठल्यावर काय होतं ते कळलं पाहिजे. विरोधात असल्यावर आंदोलनाशिवाय पर्याय नाही. आम्ही सर्व जण एक आहोत. बंडखोर येवुद्या किंवा बीजेपी येवुद्यात. आपण सर्वजण एकजुटीने काम करून राष्ट्रवादीची सत्ता राज्यावर आणणे गरजेचे आहे. विचारांची लढाई विचाराने करणे गरजेची आहे. नुकतेच उदयनराजेंनी रामराजेंच्या बाजुचीच भुमिका घेतली. त्यांनी स्पष्ट केले कि म्हसवड येथे व कोरेगाव येथे दोन्हीकडे एमआयडीसी होऊद्यात, हेच रामराजेंचे मत आहे. गोविंद मिल्क आता अमुलला फाईट देत आहे, हा आमचा अभिमान आहे. सरकार बदलले नसते तर वेदांता हे पुण्यातच उभारले असते. मुंबईच महत्त्व कमी करण्यासाठी भाजपाला मुंबई महापालिका हवी आहे, असेही यावेळी आमदार शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केले.

राज्यात गेल्या तीन महिन्यांपूर्वी सत्तांतर झाले, हे सरकार टिकेल किंवा टिकणार नाही, सरकार सत्तेत आल्यानंतरचे ह्या सरकाचे कामकाज हे त्यांचा पक्ष वाढवण्याचे काम करत आहे. सर्वसामान्यांचे प्रश्नांकडे ह्या सरकारचे पुर्णतः दुर्लक्ष केले आहे. सातारा जिल्हा हा पवार साहेबांचा जिल्हा आहे. फलटण तालुक्याने व सातारा जिल्ह्याने पवार साहेबांच्या पाठीशी उभे राहण्याचे काम केले आहे. रामराजेंच्या नेतृत्वाखाली फलटण तालुक्यासह सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी मजबुत करण्याचे काम केले आहे. भाजपा सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार नाही तर बड्या उद्योजकांचे सरकार आहे. भाजपा सरकारनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता त्यांनी केली का ? देशावरचे कर्ज हे आधीच्या पेक्षा जास्त झाले आहे. हे सर्व मुद्दे सर्वसामान्य नागरिकांच्या समोर नेणे गरजेचे आहे. सातत्य व चिकाटी न सोडता सर्वसामान्य नागरिकांच्या पर्यंत आपली कामे पोहचणे गरजेचे आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष गोरे यांची रामराजेंच्यावर बोलण्याची लायकी नाही. पवार साहेबांच्या माध्यमातुन रामराजेंनी फक्त फलटण नव्हे तर माण तालुक्यातील जिहे कठापुरसह इतर कामांची पायाभरणीचे काम केले आहे. ते आमदार तालुक्यात आले की आपला विजय निश्चित होतो. आता त्या आमदारांनाच बदलायची गरज आहे, असे मत यावेळी आमदार दीपक चव्हाण यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विचार तळागळात पोहचवण्यासाठी जनसंपर्क अभियानाचे आयोजन करण्याचे निर्देश शरद पवार यांनी दिले आहेत. सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे व तो अबाधितच राहील असा विश्वास सर्वांना आहे. सर्वसामान्य जनता ही पवार साहेबांची साथ कधीही सोडणार नाही. ठामपणे भुमिका घेवुनच आपल्याला काम करण्याची गरज आहे. सत्ता नसताना कोणताही विचार न करता काम करणे गरजेचे आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून फलटण तालुका व सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीच्या सोबतच राहिला आहे, असे मत यावेळी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी प्रास्ताविकात व्यक्त केले.


Back to top button
Don`t copy text!