स्थैर्य, नवी दिल्ली, दि.१३: डीजीसीएने हवाई प्रवास करणा-यांसाठी नवी नियमावली जाहीर केली आहे. या नव्या नियमावलीनुसार प्रवाशांना सरकारी विमानतळ आणि विमानात फोटो काढता येणार नाहीत. काही विशेष प्रकरणांमध्ये परवानगी घेऊन फोटो काढण्याची मुभा मिळू शकेल. त्यासाठी डीजी, जॉईंट डीजी, डेप्युटी डीजी यांची लिखित परवानगी आवश्यक असेल.
डीजीसीएने याबद्दल एक आदेश प्रसिद्ध केला आहे. ‘एअरक्राफ्ट नियम १९३७ च्या नियम क्रमांक १३ नुसार कोणत्याही व्यक्तीला विमानतळ किंवा विमानात फोटो काढण्याची परवानगी नाही. केवळ डीजी, जॉईंट डीजी, डेप्युटी डीजी यांची लिखित परवानगी असल्यावरच एखाद्या व्यक्तीला फोटो काढण्याची मुभा मिळू शकते, याची तुम्हाला कल्पना आहे,’ असे डीजीसीएने आदेशात म्हटले आहे. विमान लँडिंग, टेक ऑफ करत असताना लिखित परवानगी लागू नसेल, असेही डीजीसीएने स्पष्ट केले आहे. सुरक्षेचे सर्वोच्च मापदंड राखले जावेत यासाठी हा आदेश प्रसिद्ध करण्यात आला आहे.
नियमांचे पालन न झाल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा डीजीसीएने दिला आहे. ‘प्रवासी विमानात नियमांचे उल्लंघन झाल्यास विमानाच्या त्या मार्गावरील फे-या पुढील दिवसापासून दोन आठवड्यांपर्यंत रद्द करण्यात येतील. संबंधित विमान कंपनीने नियम मोडणा-या प्रवाशांवर योग्य कारवाई केल्यानंतरच तिला सेवा पूर्ववत करण्याची परवानगी देण्यात येईल,’ असे डीजीसीएने आदेशात म्हटले आहे.