दैनिक स्थैर्य । दि. २४ नोव्हेंबर २०२१ । फलटण । राज्यातील मुदत संपत आलेल्या महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती अशा विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल लवकरच वाजणार आहे. यामध्ये फलटण नगरपरिषद, सातारा जिल्हा परिषद व फलटण पंचायत समिती यांचाही समावेश असल्याने अर्थातच आपल्या तालुक्यातील राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते यांना या आगामी निवडणूकांचे वेध लागले आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्था वाटेल त्या परिस्थितीत स्वतःच्या ताब्यात घेण्यासाठी राजकीय आडाखे आखायला सुरुवात झाली आहे. मात्र गेल्या पाच वर्षात ज्यांनी कोणतेही सामाजिक, विधायक कार्य केले नाही अशा व्यक्तीसुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा माध्यमांमधून समजत आहे. पाच वर्ष शांत बसायचे, घराबाहेर पडायचे नाही, विकास कामांना कोणताही हातभार लावायचा नाही, उलट चांगली विकास कामे, सामाजिक उपक्रम करणार्यांना सतत विरोध करुन आपले अस्तित्व दाखवत राहण्याची धडपड अशा मंडळींकडून वारंवार सुरु असते. पाच वर्षे समाजात न मिसळलेल्या, जनसामान्यांच्या सुख-दु:खात सामील न झालेल्या अशा व्यक्ती निवडणूका आल्या की खडबडून जाग्या होतात आणि आपल्याला जनतेचा किती कळवळा आहे हे दाखवू लागतात. मग वारंवार लोकांच्या गाठी-भेटी, विकासाच्या थापा मारणे, इतरांची बदनामी करणे असे नसते उद्योग या लोकांचे सुरु होतात. खरं तर अशा लोकांपासून नागरिकांनी सावध राहणे उचित ठरणार आहे. आपली दिशाभूल करणार्यांना ओळखून आपल्या शहराचे, गावाचे व पर्यायाने तालुक्याचे हित आजवर कोणी जोपासले आहे आणि इथूनपुढेही सक्षमपणे कोण विकासकामे करेल या बद्दल प्रत्येकाने आपले मत आत्तापासूनच ठाम करावे.
काही दिवसांपूर्वी फलटण नगर परिषद जनरल बोर्डमधे प्रभाग 12 व फलटण मधील रस्ते पाणी पाईपलाईन याबाबतची कामे मंजूर करून घेण्यात आली. अनुचित पण रुढ झालेल्या प्रथेप्रमाणे काही विघ्नसंतोषी लोक या कामांबाबत जिल्हाधिकार्यांकडे तक्रार करून विकास कामात अडथळे निर्माण करु शकतात. असे उद्योग आजवर अनेकदा होत आल्याने विकास कामांना खीळ बसून सर्वसामान्य जनतेला त्रास भोगावा लागला आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा व्यक्तींच्या विचारांना बळी न पडणे गरजेचे आहे. सन 1991 पासूनच्या विकास कार्यांचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत. ही विकासाची गंगा अशीच अविरत सुरु ठेवायची की सत्तापालट करुन परत अराजकतेला निमंत्रण द्यायचे हा निर्णय सर्वस्वी फलटणकरांनी घ्यायचा आहे.
आता तुर्तास केवळ फलटण नगरपालिकेच्या निवडणूकीचा विचार केल्यास येत्या काही दिवसात नवीन प्रभाग रचनेस मंजूरी मिळाल्यानंतर निवडणूक आयोगाकडून निवडणूकीचा कार्यक्रम घोषीत केला जाईल. या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून कुणाला पैशाचे तर कुणाला नोकरीचे प्रलोभन दाखवले जाईल. थापेबाजी, दमबाजी, वारेमाप पैशाचा वापर असे साम, दाम, दंड, भेद अशा सर्व पद्धतींचा वापर पालिकेची सत्ता मिळवण्यासाठी विविध राजकीय शक्तींकडून केला जाईल. सुजाण मतदारांनी मात्र आजवर शहर विकासासाठी कोण कष्ट घेत आहेत? शहरात विविध योजना राबवून कुणी विकास साधला आहे? इथून पुढेही शहर विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी आणण्यासाठी कोण सक्षम आहे? शहर विकासाच्या आड कोण येत आहे? कोणामुळे विकासकामे रखडत आहेत? या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करणे इष्ट ठरणार आहे. त्यामुळे पाच वर्षे गायब असणार्यांपैकी कुणी निवडणूकीच्या निमित्ताने तुमची मनधरणी करण्यासाठी तुमच्याकडे अचानक प्रकट होत असतील तर अशा व्यक्तींना विचारा, गेल्या पाच वर्षात किंवा दहा वर्षात तुम्ही काय करत होता?, कुठे होता?, आम्ही तुम्हाला बघितलेले नाही?, आमच्याशी याआधी आपण संपर्क का ठेवला नाही?, निवडणूक आल्यावरच तुम्ही प्रलोभने दाखवण्यास सुरुवात करता तर तुम्हाला मतदान आम्ही का करायचे?, तुमच्या हातात सत्ता कोणत्या कारणाने द्यायची? जेव्हा असे प्रश्न तुम्ही या लोकांना विचाराल तेव्हा अशा अपप्रवृत्तींना नक्कीच आळा बसेल, आणि विकासकामातील अडथळे दूर होतील.
– डॉ.श्रीकांत कृष्णराव मोहिते,
माजी पशुप्रांत, ओंकार गार्डन, लक्ष्मीनगर, फलटण.
मो.9403940761