स्थैर्य, औरंगाबाद, दि.१२: सरकार बदलले की जुन्याच याेजनांत बदल करून नवीन नावांनी त्याची अंमलबजावणी केली जाते. अापल्या पक्षासाठी अादर्श असलेल्यांची नावे या याेजनांना दिली जातात. त्याच आधारे महाविकास अाघाडी सरकारनेही बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने स्मार्ट कृषी याेजना व शरद पवार यांच्या नावाने ग्रामसमृद्धी याेजना जाहीर केली. या लाेकांचे विविध क्षेत्रात उल्लेखनीय याेगदानही असते. मात्र औरंगाबाद जिल्हा परिषदेने मात्र अवघे ३१ वर्षे वयाेमान असलेले व मंत्रिपदाचा उणापुरा एका वर्षाचाच अनुभव असलेले शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या नावाने एक याेजना जाहीर करण्याचा ‘विक्रम’ केला आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या व विमुक्त जातीमधील मागासवर्गीय युवकांना चारचाकी वाहनचालक परवाना प्रशिक्षण मिळावे व त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी या हेतूने जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीने एक याेजना सर्वसाधारण सभेत सादर केली. त्याला ‘आदित्य ठाकरे युवा चारचाकी वाहनचालक परवाना प्रशिक्षण योजना’ असे नावही देण्यात आले. यासाठी ३० लाख रुपयांची अंदाजपत्रकात तरतूद केली आहे.
या योजनेअंतर्गत मागासवर्गीय युवकांनी चारचाकी वाहनचालक परवाना काढण्यासाठी लागणारे शुल्क व एका महिन्याचा निवासी भत्ता यासाठी अनुदान दिले जाणार अाहे. किमान दहावी नापास किंवा त्यापेक्षा अधिक शैक्षणिक अर्हतेचे उमेदवार यासाठी पात्र ठरणार अाहेत.
आदित्य हे आयडाॅल
आदित्य ठाकरे हे तरुणांचे प्रतिनिधी असून सरकारमधील आयडाॅल आहेत. म्हणूनच युवकांसाठी सुरू केलेल्या याेजनेस त्यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला. – मोनाली राठोड, समाजकल्याण सभापती