
सातारा : कादंबरी लेखन कार्यशाळेत मार्गदर्शन करताना डॉ. श्री. बाळासाहेब लबडे. त्यावेळी ज्येष्ठ पत्रकार मुकुंद फडके, रवींद्र भारती, डॉक्टर राजेंद्र माने.
स्थैर्य, 5 मार्च, सातारा : सातारा मराठी भाषेचा सन्मान आणि साहित्यनिर्मितीची जाण जागवण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा शाहूपुरी (सातारा) आणि सातारा नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मराठी भाषा पंधरवडा’ अंतर्गत कादंबरी लेखन कार्यशाळा मोठ्या उत्साहात पार पडली. नगरवाचनालयाच्या पाठक हॉल येथे सकाळी ९.३० ते दुपारी १ या वेळेत झालेल्या या कार्यशाळेला साहित्यप्रेमींची लक्षणीय उपस्थिती लाभली.
कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ कादंबरीकार डॉ. श्री. बाळासाहेब लबडे यांनी ‘साहित्य निर्मितीची प्रक्रिया आणि कादंबरी’ या विषयावर विस्तृत विवेचन केले. त्यांनी कादंबरीची संकल्पना, व्याप्ती आणि बदलती रूपे यांचा ऐतिहासिक व तात्त्विक संदर्भांसह ऊहापोह केला. ”कादंबरी ही केवळ कथा नसून मानवी जीवनाचा व्यापक पट उलगडणारी कलाकृती आहे,” असे प्रतिपादन करत त्यांनी कथ्य आणि कथन यांचा समन्वय कसा साधावा, याविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी सातारा नगरपालिका महिला व बालकल्याण सभापती सौ.मोनिका घोरपडे, उपसभापती सौ.सुजाता गिरीगोसावी मसाप शाहूपुरी शाखेचे अध्यक्ष नंदकुमार सावंत, ज्येष्ठ पत्रकार मुकुंद फडके, रवींद्र भारती, डॉक्टर राजेंद्र माने,बाबुराव शिंदे, संजय माने, सचिन सावंत उपस्थित होते.
डॉ. लबडे यांनी पाश्चात्त्य व भारतीय अभ्यासकांच्या व्याख्यांचा संदर्भ देत कादंबरीच्या संकल्पनेचा मागोवा घेतला. E. M. Forster यांनी मांडलेली लांबीवर आधारित व्याख्या, Henry James यांचा अनुभवसिद्ध वास्तववाद, Mikhail Bakhtin यांची बहुवाचकतेची संकल्पना आणि Georg Lukacs यांचा अस्तित्ववादी मूल्यशोध यांचा त्यांनी आढावा घेतला. मराठी साहित्यातील समाजाभिमुख दृष्टिकोनाचाही त्यांनी उल्लेख केला.
”कादंबरीची एकच निश्चित व्याख्या नसून ती काळानुसार बदलत जाते; मात्र जीवनाचे सखोल आणि कलात्मक चित्रण हीच तिची मध्यवर्ती ओळख आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यशाळेत कादंबरीचे पारंपरिक घटक—कथानक, पात्रे, कथन, काळ, अवकाश, संवाद, भाषा-शैली, आशय, वातावरण आणि उद्देश—यांचे सखोल विश्लेषण करण्यात आले.प्रथमपुरुषी कथनशैलीचे स्पष्टीकरण करता “पिपिलिका मुक्तिमाम”मराठी कादंबरीच्या परिवर्तनाच्या टप्प्यावरील ठरलेल्या महत्त्वाच्या या कादंबरीचा दाखला देण्यात आला. ग्रामीण जीवनाच्या चित्रणासाठी इंधन हमीद दलवाई याचा उल्लेख करण्यात आला.
कार्यशाळेत ऐतिहासिक, पौराणिक, चरित्रात्मक, आत्मचरित्रात्मक, वैचारिक, राजकीय, ग्रामीण, दलित आणि आदिवासी अशा कादंबऱ्यांच्या प्रकारांचे सविस्तर विवेचन झाले. वक्त्यांनी स्पष्ट केले की, प्रत्येक प्रकाराचे स्वतंत्र वैशिष्ट्य असले तरी सर्व प्रकारांचे केंद्र मानवी जीवनाचे वास्तवदर्शी आणि संवेदनशील चित्रण हेच आहे. उत्तर आधुनिक काळातील प्रायोगिक कादंबरीच्या वैशिष्ट्यांवरही विशेष सत्र घेण्यात आले. पारंपरिक कथानकाच्या चौकटी मोडून चेतनाप्रवाह, तुटक कालरचना, प्रतीकवाद, खुला शेवट आदी तंत्रांचा वापर कसा केला जातो, याचे काळमेकर लाईव्ह चिंबोरे युद्ध शेवटची जलाओग्राफीयाचे स्पष्टीकरण देण्यात आले.
जागतिक संदर्भ देताना Ulysses, Mrs Dalloway आणि The Sound and the Fury यांचा उल्लेख करून आधुनिक साहित्यिक प्रयोगांची माहिती देण्यात आली. योगिक कादंबरी ही साहित्यिक धाडसाचे प्रतीक असून ती वाचकाला सक्रिय सहभागासाठी प्रवृत्त करते,” असे मत व्यक्त करण्यात आले.
कादंबरीच्या रचनेतील ‘काळ’ आणि ‘अवकाश’ या दोन मूलभूत घटकांचा सुसंवाद कसा साधावा, यावरही मार्गदर्शन झाले. ऐतिहासिक पार्श्वभूमी, सामाजिक संदर्भ आणि मानसिक काळ यांचा योग्य वापर कादंबरीला वास्तवदर्शी बनवतो, असे सांगण्यात आले.मराठी कादंबरी आज कादंबरी म्हणजे एक मोठी गोष्ट याच्या पलीकडे कशी गेलेली आहे याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. जागतिक स्तरावर ती त्यांनी स्वत:च्या कादंबऱ्या कशा पोहोचलेल्या आहेत याबद्दल उपस्थितांना सांगितले.
दुसऱ्या सत्रामध्ये प्रत्यक्ष कादंबरी लेखनाचे सत्र होते यामध्ये बहुसंख्या लेखक वाचक शिक्षक यांनी सहभाग घेतला त्यांनी लिहिलेल्या कादंबरी अंशाचे वाचन करण्यात आले व त्यावर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेत उपस्थित साहित्यप्रेमींनी प्रश्नोत्तर सत्रात सक्रिय सहभाग घेतला. नवोदित लेखकांसाठी अशा कार्यशाळा अत्यंत उपयुक्त ठरतात, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या आयोजनात परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली. मराठी भाषा पंधरवड्याच्या निमित्ताने आयोजित हा उपक्रम साताऱ्यातील साहित्यचळवळीला नवे बळ देणारा ठरला.
साताऱ्यात पार पडलेली ही कादंबरी लेखन कार्यशाळा साहित्यनिर्मितीच्या प्रक्रियेचा सखोल अभ्यास घडवून आणणारी ठरली. कादंबरीच्या कथ्य-कथनापासून ते प्रायोगिक प्रवाहापर्यंत विविध अंगांचा ऊहापोह करून नव्या पिढीतील लेखकांना लेखनासाठी प्रेरणा देण्यात आली.
मराठी भाषा पंधरवड्याच्या निमित्ताने आयोजित हा उपक्रम साहित्यसंस्कृतीला बळकटी देणारा आणि वाचक-लेखक यांच्यातील संवाद वृद्धिंगत करणारा ठरल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

