कुख्यात गुंड गजा मारणे याला वाईमध्ये अटक; पुणे पोलिसांची कारवाई

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. १७ ऑक्टोबर २०२२ । सातारा । कुख्यात गुंड गज्या मारणे याला पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने सातारा जिल्ह्यातील वाई येथून ताब्यात घेतले. शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतविलेल्या 4 कोटी रुपयांच्या बदल्यात 20 कोटी रुपयांच्या मागणी करून त्यासाठी व्यावसायिकाचे अपहरण करून त्याला मारहाण केल्याचा आरोप मारणे याच्यावर आहे. आठ दिवसांहून अधिक काळ तो पोलिसांना गुंगारा देत होता. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला 20 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.याप्रकरणात गज्यासह 14 जणांवर नुकतीच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली.

गजानन ऊर्फ गज्या ऊर्फ महाराज पंढरीनाथ मारणे (रा. शास्त्रीनगर, कोथरूड) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणात सचिन ऊर्फ पप्पू दत्तात्रय घोलप (वय 43, रा. धनकवडी), हेमंत ऊर्फ आण्णा बालाजी पाटील (वय 39, रा. बुरली, ता. पलूस, जि. सांगली), अमर शिवाजी किर्दत (वय 46, रा. कोडोवली, जि. सातारा), फिरोज महंमद शेख (वय 50, रा. समर्थनगर, कोडोवली, जि. सातारा), रूपेश कृष्णराव मारणे (रा. कोथरूड), संतोष शेलार (रा.कोथरूड), मोनिका अशोक पवार (रा. दोपोडी), अजय गोळे (रा.नर्‍हे), नितीन पगारे (रा. सातारा), प्रसाद खंडागळे (रा. तळजाई पठार, सहकारनगर), नवघने, कोल्हापूर येथील डॉ. प्रकाश बांदिवडेकर (रा. चंदगड, जि. कोल्हापूर) यांच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई केलेल्यांची नावे आहेत.

फिर्यादी हे सिंहगड रस्ता परिसरात राहण्यास असून, त्यांचा जमीन खरेदी विक्री व शेअर ट्रेडींगचा व्यवसाय आहे. त्याच माध्यमातून त्यांची हेमंत पाटील याच्याशी ओळख झाली होती. पाटील याने व्यावसायिकाकडे ४ कोटी रुपये शेअर्समध्ये गुंतवणुकीसाठी दिले होते. त्यावरुन त्यांच्यात वाद झाले होते. पाटील हा सराईत गुन्हेगार आहे. दरम्यान, पाटील, सचिन घोलप, अमोल किर्दत व यांच्यासह अन्य आरोपींनी शुक्रवारी (दि.7) फिर्यादी व त्यांच्या एका मित्राला कात्रज येथील आयसीआयसीआय बँकेजवळून अपहरण केले. त्यांना जबरदस्तीने गाडीमध्ये बसवून रात्रभर रावेत, वाकड परिसरामध्ये फिरविले. तेथे पाटील याने त्यांच्याकडे 20 कोटी रुपयांची मागणी केली. त्यानंतर त्यांना रात्रभर वेगवेगळया गाडीमधून फिरवून खोटा बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत मारहाण केली होती.

हा गुन्हा केल्यापासून गज्या मारणे हा फरार झाला होता. त्या आधारे गुन्हे शाखेची विविध पथके गज्याच्या मागावर होती. अशातच गजा सातार्‍यातील वाई परिसरात लपून बसला असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक बालाजी पांढरे यांना मिळाली होती.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त संदीप कर्णिक, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने गज्याला अखेर ताब्यात घेतले. वरिष्ठ निरीक्षक बालाजी पांढरे, सहायक निरीक्षक चांगदेव सजगणे, उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, मोहनदास जाधव, विजय गुरव, प्रदीप शितोळे, शैलेश सुर्वे, राहुल उत्तरकर, सचिन अहिवळे, अमोल पिलाने यांच्या पथकाने ही कारवाई केली.

दरम्यान, गुन्ह्यात रेकी करणारा व अपहण करण्यात आलेल्या फिर्यादीची इतंभूत माहिती गज्या मारणेच्या टोळीला पोहचविणार्‍या प्रसाद बापू खंडाळे (वय 28, रा. तळजाई वसाहत, लुंकड शाळेजवळ, पदमावती) याला गुन्हे शाखेचे सहायक पोलीस उपायुक्त नारायण शिरगावर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार सुधीर इंगळे, नितीन शिंदे, भाऊसाहेब रोडमिसे यांनी बेड्या ठोकल्या. त्याला दांडेकर पूल येथे लपून बसला असताना सापळा रचून अटक करण्यात आली.


Back to top button
Don`t copy text!