दैनिक स्थैर्य । दि. १५ डिसेंबर २०२२ । फलटण । माढा लोकसभा मतदारसंघासह संपूर्ण राज्यांमध्ये धनगर समाज मोठ्या प्रमाणावर आहे. राज्य शासनाच्या सूचीसह केंद्र सरकारच्या सूचीमध्ये धनगर ऐवजी धनगड असा उल्लेख केलेला आहे. तरी याबाबत केंद्र सरकारच्या वतीने ठोस पावले उचलून धनगड ऐवजी धनगर असा उल्लेख असलेली अधिसूचना प्रकाशित करण्यात यावी. यामुळे धनगर समाजातील बांधवांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळेल, अशी मागणी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी लोकसभेमध्ये केली.
यावेळी बोलताना खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर असे म्हणाले की, सण १९६१ साली तयार करण्यात आलेल्या ग्रंथ सूची मध्ये धनगड असा उल्लेख करण्यात आलेला आहे. परंतु वास्तविक पाहता देवनागरी भाषेमध्ये त्याचा उच्चार व उल्लेख हा धनगर म्हणूनच करण्यात येतो. याशिवाय कोणत्याही इतर दस्तऐवजांमध्ये धनगड असा उल्लेख आढळून आलेला नाही. राज्य सरकारच्या वतीने तयार करण्यात आलेल्या सूचीमध्ये सुद्धा धनगर असाच उल्लेख आहे.
सन 1950 ते आजपर्यंत महाराष्ट्र राज्यामध्ये अनुसूचित जातींच्या सूचीमध्ये एकूण 36 जातींचा समावेश आहे. त्यामध्ये धनगड या जातीचे प्रतिनिधित्व शून्य आहे. परंतु धनगर समाजाचे प्रतिनिधित्व राज्यांमध्ये मोठे आहे, ही बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारने याबाबत कार्यवाही तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले.
महाराष्ट्र राज्यामध्ये विशेषतः माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये धनगर समाज हा अत्यंत कष्टकरी व गरीब समाज म्हणून ओळखला जातो. अनुसूचित जनजातीच्या सूचीमध्ये 36 व्या क्रमांकावर धनगड नावाचा उल्लेख आढळून येतो. वास्तविक पाहता त्या ठिकाणी धनगर असा उल्लेख करण्यात यावा, असेही यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.