
दैनिक स्थैर्य । दि. २७ एप्रिल २०२२ । फलटण । कोरोना वाढत्या प्रादुर्भावामुळे गेल्या २ अडीच वर्षात धार्मिक कार्यक्रम, किर्तन, प्रवचन, यात्रा, जत्रा, सामुदायिक कार्यक्रम यासह विवाह सोहळ्यावर निर्बंध आले होते, ते आता टप्या टप्प्याने खुले होत असून सार्वजनिक कार्यक्रम, उपक्रम, किर्तन, प्रवचन लग्न सोहळे सुरु होत असल्याचे पार्श्वभूमीवर सर्वांनी आपल्या रुढी, परंपरा आणि संस्कार जपण्याची आवश्यकता युवक मित्र ह.भ.प. बंडा महाराज कराडकर यांनी स्पष्ट पणे नमूद केली आहे.
सकल संत सांप्रदायिक व अध्यात्मिक आणि सामाजिक विकास सेवा संस्था (वारकरी संघटना) फलटण या संस्थेच्या माध्यमातून ह.भ.प. चि. पवन महाराज सावंत, फलटण आणि चि. सौ. कां. प्रतिक्षा चव्हाण, नाशिक यांचा विवाह सोहळा आशिर्वाद मंगल कार्यालय, फलटण येथे नुकताच संपन्न झाला, त्यावेळी वधू – वरांना शुभाशीर्वाद आणि उपस्थित समाज बांधवांना मार्गदर्शन करताना युवक मित्र ह.भ.प. बंडा तात्या कराडकर बोलत होते. यावेळी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे, महानंदचे व्हा. चेअरमन डी. के. पवार, फलटण तालुका सहकारी दूध पुरवठा संघाचे चेअरमन धनंजय पवार, फलटण तालुका संघर्ष समिती अध्यक्ष ॲड. नरसिंह निकम, माजी नगरसेवक सुदामराव मांढरे, अशोकराव जाधव यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, कीर्तनकार, वारकरी, भजनी मंडळ, वधू – वरांचे आप्तेष्ट, मित्रमंडळी उपस्थित होती.
विवाह सोहोळयांना कोरोना नंतर परवानगी मिळाली असली तरी आता सर्व समाज घटकांनी विवाह सोहोळा भारतीय संस्कृतीला अनुसरुन आयोजित करावा ज्यायोगे वायफट खर्च टाळण्याबरोबर या विवाह सोहोळयांचा आनंद घेता यावा यासाठी पा पद्धती ऐवजी भारतीय संस्कृतीला अनुसरुन विवाह सोहळ्याचे आयोजन करण्याचे आवाहन युवक मित्र ह.भ.प. बंडा तात्या कराडकर यांनी यावेळी केले.
सकल संत सांप्रदायिक व अध्यात्मिक आणि सामाजिक विकास सेवा संस्था (वारकरी संघटना) फलटण या संस्थेच्यावतीने आयोजित करण्यात आलेला हा सोहोळा बिगर हुंडा, दातृत्व पद्धतीने कन्यादान, तसेच डीजे, बेंजो, डान्स, वाजंत्री, घोडा, वरात, फटाक्यांची आतषबाजी या सर्वांना फाटा देवून वारकरी सांप्रदायातील पालखी, टाळ, मृदंगाच्या निनादात वधू – वर आणि पाहुणे मंडळी मंगल कार्यालयात पोहोचल्यानंतर अत्यंत शांततेत सर्व धार्मिक विधीसह विवाह सोहोळा संपन्न झाला. आयोजक संस्थेचे खजिनदार डी. एम. घनवट व सौ. वनिता घनवट यांनी पुरोहितांच्या सूचनेनुसार विधीवत कन्यादान केले.
संयोजक संस्थेचे प्रमुख ह.भ.प. केशव महाराज जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांच्या संकल्पनेतून हा अनोखा परंतू कोणताही गडबड, गोंधळ, अनाठायी खर्च याला फाटा देवून संपन्न झालेल्या या विवाह सोहळ्याचे सर्वच उपस्थितांनी कौतुक करीत ह.भ.प. केशव महाराज जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांना धन्यवाद आणि वधू – वरांना शुभेच्छा दिल्या.