“आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही”; ‘चलो मुंबई’साठी फलटण तालुक्यातून हजारो मराठा बांधव सज्ज

२८ ऑगस्टला मुंबईच्या दिशेने होणार कूच; शहरात जनजागृतीसाठी भव्य होर्डिंग्ज


स्थैर्य, फलटण, दि. १९ ऑगस्ट : मराठा आरक्षणाच्या निर्णायक लढाईसाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी दिलेल्या ‘चलो मुंबई’च्या नाऱ्याला फलटण तालुक्यातून जोरदार प्रतिसाद मिळत आहे. “आता नाही तर कधीच नाही,” या भावनेने पेटून उठलेले हजारो मराठा युवक आणि बांधव, येत्या २८ ऑगस्ट रोजी आपल्या विविध वाहनांनी मुंबईच्या दिशेने कूच करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

मनोज जरांगे-पाटील यांच्या मुंबईतील उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी फलटण तालुक्यातून हजारो कार्यकर्ते सहभागी होणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आली आहे. यासाठी तालुक्यात मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात असून, फलटण शहराच्या चारी बाजूंना ‘चलो मुंबई’चा संदेश देणारे भलेमोठे होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत.

नुकत्याच झालेल्या फलटण दौऱ्यात मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना कानमंत्र दिला होता, त्यानंतर आंदोलनाच्या तयारीला अधिकच वेग आला आहे. २८ ऑगस्ट रोजी फलटण तालुक्यातील मराठा बांधव छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे एकत्र जमून महाराजांना अभिवादन करतील आणि त्यानंतर मोटारसायकल, कार, ट्रॅक्टर, टेम्पो अशा मिळेल त्या वाहनाने मुंबईच्या आझाद मैदानाकडे रवाना होतील.

आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडायची नाही, या निर्धाराने पश्चिम महाराष्ट्रातील लाखो मराठा बांधव या आंदोलनात सहभागी होण्यासाठी तयारी करत असून, फलटण तालुक्यातूनही मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.


Back to top button
Don`t copy text!