
स्थैर्य, फलटण, दि. १९ ऑगस्ट : फलटण-दहिवडी-मायणी-विटा-सांगली या राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरण आणि काँक्रिटीकरणाच्या कामाला गती देण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे आणि कामात अडथळे आणू नयेत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. रस्त्याच्या रुंदीबाबत कोणताही गैरसमज पसरवू नये, असेही राष्ट्रीय महामार्ग विभागाने स्पष्ट केले आहे.
प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, रस्त्याची सध्याची रुंदी २० ते ३० मीटर असून, त्यातील १० मीटर भागाचे काँक्रिटीकरण (सातारा-पंढरपूर रस्त्याप्रमाणे) केले जाणार आहे. हे काम सध्याच्या रस्त्याच्या हद्दीतच होणार असून, त्यासाठी सरसकट जमीन अधिग्रहणाची आवश्यकता नाही. केवळ आवश्यक वळण सुधारणा आणि पथकर नाक्यासाठी मर्यादित भूसंपादन केले जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने यापूर्वीच रस्त्याच्या हद्दीचे सीमांकन केले असून, ज्या नागरिकांना किंवा शेतकऱ्यांना आपल्या जागेबद्दल शंका आहे, त्यांनी भूमी अभिलेख विभागाकडे रीतसर मोजणीसाठी अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
हा प्रकल्प २४ महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन असून, कामाच्या गुणवत्तेवर प्रशासनाचे बारीक लक्ष असणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास दळणवळण सुलभ होऊन सांगली-सातारा जिल्ह्याच्या आर्थिक व भौगोलिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सकारात्मक भूमिका घेऊन या प्रकल्पाला पाठिंबा द्यावा, अशी अपेक्षा प्रशासनाने व्यक्त केली आहे.