स्थैर्य, वाई, दि. १५ : महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या वाई तालुक्यातील मांढरदेव गडावर सध्या मंदिर परिसरातील दुकानदारांचे नव्या शॉपिंग कॉम्लेक्समध्ये स्थलांतर करण्याचे प्रयोजन सुरु असून त्यासाठी ट्रस्टने दुकानदारांना नोटिसा पाठवल्या आहेत. मात्र या स्थलांतरास दुकानदारांसह ग्रामपंचायतीचा विरोध असून मांढरदेवचा विकास होण्यासाठी ट्रस्टची रचनाच बदला, ट्रस्टच्या अध्यक्षपदी न्यायाधीश नकोत, अशी मागणी मांढरदेवकरांनी केली आहे.
मांढरदेववरील ट्रस्टने नोटिसा काढल्याच्या पार्श्वभूमीवर दुकानदार व स्थानिकांनी आमदार मकरंद पाटील यांची भेट घेवून स्थलांतरास विरोध असल्याची भूमिका मांडून त्यांना निवेदनही दिले. यावेळी मांढरदेवसारख्या ट्रस्टकडे कोटय़वधी रुपये पडून असून ट्रस्टला पूर्ण वेळ लक्ष देणारा अध्यक्ष नसल्याने विकास खुंटला आहे. न्यायाधीशांसारखी उच्चपदस्थ व्यक्ती ट्रस्टचे अध्यक्ष असले त्यांना ट्रस्टच्या कामाकडे पाहण्यासाठी वेळ नसतो. त्यामुळे शासनाने साई संस्थान, पंढरपूर देवस्थान ट्रस्टप्रमाणे लोकप्रतिनिधींना ट्रस्टच्या अध्यक्षपदी नियुक्त करावे, अशीही मागणी यावेळी मांढरदेव ग्रामस्थांनी केली.दरम्यान, यावेळी दि. 26 जून रोजी मांढरदेव देवस्थान ट्रस्टने मंदिर परिसरातील दुकानदारांना नव्याने बांधण्यात आलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये स्थंलातर करण्याबाबत नोटीसा पाठवल्या आहेत. मात्र महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे उभारण्यात आलेल्या या शॉपिंग प्रकल्पास ग्रामस्थांचा प्रारंभीपासून विरोध होता व आहे. त्यासंदर्भात ग्रामपंचायतीने ठराव करुन विरोधही दर्शवलेला असल्याचे आमदार मकरंद पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले.स्थंलातरास विरोध असण्याची कारणेही दुकानदार, ग्रामस्थांनी यावेळी आमदार पाटील यांना दिलेल्या निवेदनात दिली. सध्या लॉकडाऊनच्या काळात देवस्थान बंद असल्याने मांढरदेवकरांची आर्थिक स्थिती बिघडलेली आहे. चार महिन्यापासून उत्पन्न नसताना अशा विपरीत परिस्थितीत ट्रस्टने घेतलेल्या विस्थापनाचा निर्णय ग्रामस्थ, दुकानदारांच्या जीवनावर दूरगामी परिणाम करणारा ठरणार आहे. ग्रामपंचायत ठरावाद्वारे विस्थापनास विरोध असतानाही ट्रस्ट नोटीसा काढून जाणीवपूर्वक ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण करत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. मंदिरकडे जाताना चढण व उतरणीच्या मार्गावरील दुकाने काढा असे न्या. कोचर आयोगाने सांगितलेले नाही. त्यांनी उतरणीच्या मार्गाशेजारी रुंदीकरण करावे असे सूचित केले होते व तसे रुंदीकरण करण्यात आल्याने आता दुकानदारांचे विस्थापन करण्याची आवश्यकता उरली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
मंदिरपासून नवीन शॉपिंग कॉम्प्लेक्स दूर..मांढरदेव दुर्घटनेनंतर न्या. राजन कोचर आयोगाच्या अहवालानुसार ट्रस्टला भाविकांना दर्शन घेता यावे यासाठी सुलभ व्यवस्था निर्माण करण्याची शिफारस केली असली तरी दुकानांचे विस्थापन करा असे म्हटलेले नाही. दुकानांचे विस्थापन केले तर भाविकांना शॉपिंग कॉम्प्लेक्सपासून 800 मीटर चालत जावे लागणार आहे. भाविकांमध्ये अबालवृध्द तसेच गरोदर महिला, आजारी व्यक्ती, अपंग व्यक्तीही असतात. त्यामुळे मंदिरापासून दूर बांधण्यात आलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये दुकानदारांचे विस्थापन झाल्यास दर्शन सुलभ होणार नाही.