दैनिक स्थैर्य । दि. ०६ डिसेंबर २०२१ । सातारा । गेल्या काही दिवसांपासून जिल्हा बँकेच्या अध्यक्षाच्या निवडीची उत्कंठा शेवटच्या क्षणापर्यंत ताणली जावून अखेर मकरंद आबांचे बंधू नितिनकाका पाटील यांची वर्णी लागली तर उपाध्यक्षपदाची माळ अनपेक्षितरित्या अनिल देसाई यांच्या गळ्यात पडली. अध्यक्षपदासाठी खासदार उदयनराजे, आमदार शिवेंद्रराजे यांचीही नावे चर्चेत होती. मात्र, राष्ट्रवादीच्या सर्वच संचालकांनी एकवटून अखेर जिल्हा बँकेचा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचाच असावा, यावर जोर धरला. काल रात्रीपासून विश्राममृहातील बैठकीत रामराजे यांच्या उपस्थितीत निवडींवर खलबते सुरू होती. यानंतर दि. 6 रोजी निवडीसाठी संचालकांची बैठक बोलावण्यात आली होती. यात नितीनकाका पाटील आणि अनिल देसाई यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर आ. शिवेंद्रराजे आणि खा. उदयनराजे बँकेच्या आवरात बाहेर पडले. निवडी जाहीर होताच नितीन काका पाटील आणि अनिल देसाई यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. बँकेच्या बाहेर फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली.
जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी नितीनकाका पाटील यांचे नाव पहिल्यापासूनच चर्चेत होते. त्यातच आ. शशिकांत शिंदे यांचाही पराभव झाल्याने राष्ट्रवादीतून तेच एकमेव प्रबळ दावेदार ठरले. नितीन काका यांचे नाव अध्यक्षपदासाठी निश्चित झाल्यानंतर शिवेंद्रबाबा यांच्या विचारांचे अनिल देसाई यांची निवड करण्यात आली आहे. अनिल देसाई यांनी भाजप उमेदवाराविरोधात विधानसभेत काम केल्याने त्यांचे भाजप पक्षातून निलंबन झाले होते. आता राष्ट्रवादी प्रणित पॅनेलमधून ते उपाध्यक्ष झाल्यामुळे त्यांची पुढील राजकीय वाटचाल कशी असेल याचीही उत्सुकता लागली आहे.