दैनिक स्थैर्य । दि. ०६ डिसेंबर २०२१ । सातारा । गेल्या काही दिवसांपासून जिल्हा बँकेच्या अध्यक्षाच्या निवडीची उत्कंठा शेवटच्या क्षणापर्यंत ताणली जावून अखेर आमदार मकरंद पाटील यांचे बंधू नितिनकाका पाटील यांची वर्णी लागली तर उपाध्यक्षपदाची माळ अनपेक्षितरित्या अनिल देसाई यांच्या गळ्यात पडली.
अध्यक्षपदासाठी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोंसले, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोंसले यांचीही नावे चर्चेत होती. मात्र, राष्ट्रवादीच्या सर्वच संचालकांनी एकवटून अखेर जिल्हा बँकेचा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचाच असावा, यावर जोर धरला. काल रात्रीपासून विश्राममृहातील बैठकीत विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत निवडींवर खलबते सुरू होती. यानंतर दि. 6 रोजी निवडीसाठी संचालकांची बैठक बोलावण्यात आली होती. यात नितीनकाका पाटील आणि अनिल देसाई यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोंसले आणि खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोंसले बँकेच्या आवरात बाहेर पडले. निवडी जाहीर होताच नितीनकाका पाटील आणि अनिल देसाई यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. बँकेच्या बाहेर फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली.
जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी नितीनकाका पाटील यांचे नाव पहिल्यापासूनच चर्चेत होते. त्यातच आमदार शशिकांत शिंदे यांचाही पराभव झाल्याने राष्ट्रवादीतून तेच एकमेव प्रबळ दावेदार ठरले. नितीन काका पाटील यांचे नाव अध्यक्षपदासाठी निश्चित झाल्यानंतर विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोंसले यांच्या विचारांचे अनिल देसाई यांची निवड करण्यात आली आहे. अनिल देसाई यांनी भाजप उमेदवाराविरोधात विधानसभेत काम केल्याने त्यांचे भाजप पक्षातून निलंबन झाले होते. आता राष्ट्रवादी प्रणित पॅनेलमधून ते उपाध्यक्ष झाल्यामुळे त्यांची पुढील राजकीय वाटचाल कशी असेल याचीही उत्सुकता लागली आहे.