
दैनिक स्थैर्य | दि. ६ सप्टेंबर २०२३ | फलटण |
फलटण येथील सरस्वती शिक्षण संस्था संचलित प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज, कोळकी (ता. फलटण) या ठिकाणी निर्भया पोलीस पथकाच्या वतीने रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुरूवातीला निर्भया पथकातील पोलीस बांधव व भगिनी यांचे प्रशालेच्या वतीने रोपे देऊन स्वागत करण्यात आले.
सातारा जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस अधीक्षक समीर शेख, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस व फलटण शहर पोलिस निरीक्षक सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण शहरातील सर्व शाळांमध्ये व महाविद्यालयांमध्ये रक्षाबंधन कार्यक्रम व निर्भया पथकाकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
यामध्ये सरस्वती शिक्षण संस्था संचलित प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, कोळकी, फलटण या ठिकाणी फलटण येथील निर्भया पोलीस पथकाच्या म. पो. फलटण सौ. वैभवी भोसले यांनी फेसबुक, इंस्टाग्राम याद्वारे सोशल मिडियाचा शालेय विद्यार्थ्यांकडून होणारा गैरवापर, अतिवापर, तरुणांकडून मुलींची होणारी छेडछाड, मुलांचे गैरवर्तन, विनापरवाना वाहन चालविणे याविषयी विद्यार्थी व विद्यार्थिनींना कायद्यांबाबत योग्य मार्गदर्शन करून विविध क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रोत्साहीत केले. त्यानंतर प्रशालेच्या विद्यार्थिनींनी पोलीस बांधवांना व महिला पोलिसांनीही विद्यार्थ्यांना राखी बांधून रक्षाबंधनाचा अनोखा उपक्रम साजरा करण्यात आला.
यावेळी संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका सौ. संध्या गायकवाड यांनी मनोगत व्यक्त करताना प्रशालेच्या वतीने पोलीस बांधवांना रक्षाबंधनानिमित्त शुभेच्छा दिल्या व उपक्रमाचे विशेष कौतुक केले. तसेच प्राचार्य अमित सस्ते यांनी हा उपक्रम राबविल्याबद्दल निर्भया पथकाचे आभार मानले. यावेळी पोलीस कॉन्स्टेबल श्री. भिसे, सौ. राधिका निकम, प्रशालेच्या पर्यवेक्षिका सौ. माधुरी माने, समन्वयिका सौ. सुवर्णा निकम आणि श्रीमती योगिता सस्ते व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.