स्थैर्य, सातारा, दि.८: पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार नीरव मोदी याच्या भारतातील प्रत्यर्पणाची उलटी गिनती सुरु झाली आहे. सध्या तुरुंगात असलेल्या नीरव मोदी याच्या प्रत्यार्पणाच्या याचिकेवर सोमवारपासून वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट कोर्टात सुनावणी सुरु झाली आहे. विशेष म्हणजे या सुनावणीसाठी भारतातून सक्तवसुली संचनालय (ईडी)ची टीम लंडनमध्ये दाखल झाली आहे.
आज सुनावणीच्या पहिल्याच दिवशी नीरव मोदी याला कोर्टाने झटका दिला. नीरव मोदीच्या वकिल क्लेअर मॉंटगोमेरी यांनी माजी न्यायाधीश न्यायमूर्ती अभय ठिपसे यांचे माध्यमांमध्ये जाहीर झालेले मत वगळण्यात यावे अशी मागणी केली होती. मात्र कोर्टाने ती फेटाळली. न्यायमूर्ती अभय ठिपसे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असला तरी या हायप्रोफाईल प्रकरणी त्यांनी व्यक्त केलेलं मत महत्वाचा आहे. ते वगळता येणार नाही, असे न्यायाधीशांनी स्पष्ट केले .
या सुनावणीला नीरव मोदी हा वँडर्सवर्थ तुरुंगातून व्हिडीओ कॉन्फरन्सने हजर झाला होता. १९ मार्च २०१९ रोजी त्याला स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी अटक केली होती. तेव्हापासून तो तुरुंगात आहे. प्रथमदर्शनी पुराव्यानुसार केंद्र सरकारने नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाची विनंती ब्रिटिश सरकारला केली होती. त्यावर नीरव मोदी याने आव्हान दिले होते. नुकताच इंटरपोलने नीरव मोदीची पत्नी अॅमी मोदी हिच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस बजावली होती.
पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार फरार हिरे व्यापारी नीरव मोदी याला सक्तवसुली संचनालयनाने (ईडी) दणका दिला आहे. नीरव मोदीची ३२९.६६ कोटींची संपत्ती ‘ईडी’ने जप्त केली होती. त्यात मुंबई, दुबई आणि लंडनमधील फ्लॅटचा समावेश आहे. अलिबागमधील फार्मा हाऊसवरदेखील ईडीने टाच आणली आहे. वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट कोर्टाने ७ ते ११ सप्टेंबर दरम्यान सुनावणीच्या तारखा निश्चित केल्या आहेत. १ डिसेंबरनंतर यावर अंतिम निकाल दिला जाणार आहे.