राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या लाभाबाबत स्वयंसेवी संस्थांनी ‘माझे रेशन माझा अधिकार’ अंतर्गत जनजागृती करावी – नागरी पुरवठा संचालक कैलास पगारे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि.१४: राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील (NFSA) पात्र व गरजू शिधापत्रिकाधारकांना राज्य व केंद्र शासनाकडून देण्यात आलेल्या योजनानिहाय अन्नधान्याचा लाभ घेण्याकरिता ‘माझे रेशन माझा अधिकार’ असा मंच करुन स्वयंसेवी संस्थांनी देखील जनजागृती करावी, जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत  लाभ पोहोचण्यासाठी शासनास सहकार्य करावे, असे आवाहन शिधावाटप नियंत्रक व संचालक, नागरी पुरवठा कैलास पगारे यांनी केले आहे.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील (NFSA) गरीब व गरजू पात्र शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्याचा लाभ मिळावा याकरिता स्वयंसेवी संस्थासमवेत वेबिनारद्वारे ऑनलाईन बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी श्री.पगारे बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या आर्थिक सहाय्य अंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, २०१३ अंतर्गत अन्नधान्य मिळण्यास पात्र असलेल्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील (NFSA) अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत मोफत वितरीत करण्यात येणाऱ्या अन्नधान्याचा लाभ मिळण्याकरिता जनजागृती करणेबाबत स्वयंसेवी संस्थांना आवाहन करण्यात आले.

आर्थिक सहाय्य योजनेंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, २०१३ अंतर्गत अन्नधान्य मिळण्यास पात्र असलेल्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील (NFSA) अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना एप्रिल व मे 2021 या दोन महिन्यांपैकी एका महिन्याचे प्रति सदस्य 3 किलो गहू व 2 किलो तांदूळ आणि अंत्योदय अन्न योजनेतील शिधापत्रिकाधारकांना प्रति शिधापत्रिका 35 किलो धान्याचे मोफत वितरण करण्यात येत आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील (NFSA) अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी यांना माहे मे 2021 करीता अनुज्ञेय असेलेले नियमित अन्नधान्याव्यतिरीक्त प्रति सदस्य प्रति माह 5 किलो अन्नधान्याचे मोफत वितरण करण्यात येत आहे. तसेच जून 2021 मध्ये अशाचप्रकारे अन्नधान्याचे मोफत वितरण करण्यात येईल. एनइआरमध्ये वर्ग केलेल्या शिधापत्रिकाधारकांना देखील शासनाच्या देय परिमाणानुसार अन्नधान्य वितरण करण्यात येणार आहे. याची माहिती सर्व स्वयंसेवी संस्थांना देण्यात आली.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेजील एकूण पात्र शिधापत्रिकांपैकी 90 टक्के शिधापत्रिकाधारक ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्याचा लाभ घेत आहे. उर्वरित 10 टक्के पात्र शिधापत्रिकाधारकांचा शोध घेऊन त्यांना धान्याचा लाभ मिळणेकरिता उपस्थित स्वयंसेवी संस्थांना जनजागृती करण्याबाबत अवगत करण्यात आले आहे.

पात्र शिधापत्रिकाधारक आहे परंतू ते ऑनलाईन डिजिटाइज्ड झालेले नाहीत अशा शिधापत्रिकाधारकांना ऑनलाईन करून त्यांना लाभ देण्यात येईल.

मुंबई/ ठाणे शिधावाटप क्षेत्रात वास्तव्यास असणाऱ्या सर्व परप्रांतीय/ इतर जिल्ह्यातील/ स्थलांतरीत पात्र लाभार्थ्यांनी “एक देश एक रेशन कार्ड” या योजनेअंतर्गत पोर्टेबिलीटीद्वारे नजीकच्या अधिकृत शिधावाटप दुकानातून देय अन्नधान्य प्राप्त करून घेता येईल.

मुंबई-ठाणे शिधावाटप यंत्रणेतील राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील सर्व पात्र शिधापत्रिकाधारकांना त्यांना शासनाकडून देय असलेल्या अन्नधान्याच्या तपशिलाबाबत शासनाच्या http://mahaepos.gov.in या संकेतस्थळावरील RC Details मध्ये जाऊन शिधापत्रिकाधारकांना त्यांचे शिधापत्रिकेकरीता देण्यात आलेल्या 12 अंकी SRC Number टाकून खातरजमा करू शकता, याबाबत जनजागृजी करण्याचे आवाहनही करण्यात आले.

टाटा सामाजिक संस्था यांनी काही भागांमध्ये पात्र लाभार्थ्यांना देय असणारे अन्नधान्य, दर त्याचप्रमाणे अन्नधान्य मिळण्याबाबतची निश्चित वेळ SMS द्वारे कळविण्याचा पथदर्शी उपक्रम राबविला आहे. त्याच धर्तीवर अन्य सामाजिक संस्थांनी पात्र लाभार्थ्यांना अन्नधान्य मिळण्याकरिता अशा प्रकारचे उपक्रम राबविण्याबाबत सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.

उपरोक्त वितरणासंदर्भात तक्रार असल्यास हेल्पलाईन क्रमांक ०२२-२२८५२८१४ तसेच ई-मेल आयडी [email protected] यावर तक्रार नोंदवावी.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील (NFSA) पात्र व गरजू शिधापत्रिकाधारकांना राज्य व केंद्र शासनाकडून देण्यात आलेल्या योजनानिहाय अन्नधान्याचा लाभ घेण्याकरिता स्वयंसेवी संस्थांनी देखील जनजागृती करावी व याकामी जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी शासनास सहकार्य करावे.


Back to top button
Don`t copy text!