प्रजासुखे सुखं राज्ञ:; श्रीमंत मालोजीराजे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. 07 सप्टेंबर 2024 । फलटण । बहुतांश संस्थानिकांच्या, राजेरजवाडय़ांच्या ऐय्याशी आणि उधळपट्टी करण्यात पिढय़ान् पिढय़ा व्यतीत झाल्या. त्यांच्या वाह्य़ातपणाचे किस्से मशहूर आहेत. त्यावर पुस्तकंही लिहिली गेली आहेत. परंतु काही संस्थाने त्यास अपवाद आहेत. त्यातीलच फलटण संस्थान हे एक होय. फलटण संस्थानच्या भारतातील विलीनिकरणास नुकतीच 73 वर्षे पूर्ण झाली आहेत. श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांच्या कारकिर्दीत संस्थानचा कारभार गौरव शिखरावर पोहोचलेला होता. आज श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर (राजेसाहेब) यांच्या जयंती निमित्त त्यांच्या कारकिर्दीचा व फलटण संस्थानचा घेतलेला वेध.

फलटण संस्थानात प्रशासकीय कारभार हा संविधानात्मक राजेशाही अशा प्रकारचा होता. म्हणजे आता ब्रिटन, कॅनडा या देशात आहे तसा. फलटण संस्थानचे अधिपती नाईक निंबाळकर आहेत. सर्व प्रकारचे अंतर्गत व परराष्ट्रीय अधिकार त्यांचाकडे निहीत होते. त्यांनी कधीही मनमानी कारभार केला नाही. 1929 मध्ये मालोजीराजे यांनी उदारमतवादी दृष्टीकोन स्वीकारत फलटण राज्यकारभाराचा एक कायदा पारित केला व संस्थानात कार्यकारी मंडळ व कायदे मंडळाची स्थापना केली. सर्वसामान्य जनतेला स्वातंत्र्य मिळाण्यापूर्वीच अधिकार बहाल केले. हा कायदा फलटण संस्थानातील लोकशाहीचा पहिला कायदा होता.

फलटण संस्थान हे भारतातील एक पुरोगामी व विकसीत संस्थान होते. त्याची स्थापना पहिले निंबराज यांनी 1284 साली केली. प्राचीन वाङ्मयात फलटणचा उल्लेख पालेठाण असा आला आहे. संस्थानातील अनेक प्राचीन मंदिरे फलटणच्या प्राचीनतेची साक्ष देतात. ही महानुभव पंथाची दक्षिण काशी होय. फलटण संस्थानचे क्षेत्रफळ हे 397 चौरस मैल होते. सुमारे 84 गावे याचा भाग होती. महाराष्ट्राच्या राजकारणात नाईक निंबाळकर घराणे हे अगदी मध्ययुगापासून ते आजतागायत कार्यरत आहे. नाईक हा किताब दिल्लीच्या बादशाहाने 13 व्या शतकात दिला.

नाईक निंबाळकर आणि भोसले घराण्याचा अगदी जुना ऋणानुबंध आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा विठोजी व मालोजी ह्यांना राजे जगपाळराव नाईक निंबाळकर यांनी दरबारात बाराशे होनांची असामी दिली होती. छ. शहाजी महाराज यांची आई दीपाबाई व शिवाजी महाराजांची पत्नी सईबाई ह्या देखील फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्यातील होत. 1860 मध्ये श्रीमंत मुधोजीराजे हे संस्थानच्या गादीवर आल्यानंतर या संस्थानचा खूप वेगाने विकास झाला. त्यांची मुंबईच्या कायदेमंडळात देखील नेमणूक होती. भारतात स्थानिक स्वराज्य संस्थांचा पाया हा लाॅर्ड रिपन यांनी घातला परंतु त्याआधी 1868 पासून फलटण येथे नगरपालिका अस्तित्वात होती. ब्रिटिश सरकारने मुधोजीराजे यांना सी. एस. आय हा बहुमानाचा किताब दिला.

त्यानंतर श्रीमंत मालोजीराजे हे सत्तेवर आले. मालोजीराजे हे एक उदारमतवादी समाजसुधारक होते. त्यांनी संस्थानात जातीभेद कधीही पाळला नाही. संस्थानात सर्व लोकांना समान वागणूक मिळत असे. त्यांचा राज्यरोहणाप्रसंगी त्यांनी फलटण मधील सर्व मंदिरात हरिजनांना प्रवेश दिला. जातीभेद न मानणे, स्पृशा-स्पृश्यता न मानता सर्व मानवजात एक आहे. अशी त्यांची धारणा होती. सन 1929 मध्ये कायदेमंडळात माधव संभाजी अहिवळे यांना स्थान देऊन मालोजीराजेंनी आपल्या कृतीतून प्रजेला योग्य संदेश दिला.

श्रीमंत मालोजीराजे यांच्या पत्नी सौ. लक्ष्मीबाई राणीसाहेब यांनी संस्थानात स्त्रीयांच्या उन्नतीसाठी विशेष कार्य केले. त्यांनी महिला मंडळ स्थापन केले प्रौढ स्त्रियांच्या शिक्षणासाठी राजवाड्यात वर्ग सुरू केले. त्यांना ह्या कार्यासाठी ब्रिटिश सरकार तर्फे “कैसर ए हिंद” हा एक मानाचा किताब दिला. श्रीमंत मालोजीराजेंनी संस्थानातील प्रजेला अगदी पुत्रवत प्रेम दिले प्रजेच्या शिक्षण, आरोग्य, रोजगार, कायदा सुव्यवस्था विषयक गरजा त्यांनी पूर्ण केल्या. फलटण संस्थानात शिक्षणाची सुरवात 1871 पासून झाली. संस्थानात अग्लो व्हर्नाक्युलर शिक्षणाचा प्रारंभ झाला. 1876 मध्ये संस्थानात तेरा शाळा होत्या व 551 विद्यार्थी शिक्षण घेत होते. शिक्षण क्षेत्रात विविध उपाययोजना व देखरेखी साठी “डेप्युटी एज्युकेशन इन्स्पेक्टर” या अधिकाऱ्याची नेमणूक केलेली होती. त्यामुळे तत्कालीन शिक्षण पध्दतीत एकसूत्रीपणा आला. संस्थानात शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत होती. साधारणपणे पहिल्या येणाऱ्या विद्यार्थ्यांस 1000 रूपये उच्च शिक्षणासाठी मिळत होते. शिक्षणासाठी गरीब विद्यार्थ्यांना “युवराज प्रतापसिंह फंड” म्हणून एक योजना त्यावेळी अस्तित्वात होती. त्या फंडामुळे गरीबांना खूप फायदा झाला. तसेच ऋग्वेद शाळा, यजुर्वेद शाळा तसेच मुस्लिमांसाठी उर्दू शाळा ही स्थापन करण्यात आली होती. त्याशाळेत मुले व मुलीसुध्दा शिक्षण घेत होत्या. स्वातंत्र्यापूर्वीही संस्थानात अल्पसंख्याकांना सर्व प्रकारच्या सुविधा पुरविण्यात येत होत्या.

बालविवाहापासून होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी 1 एप्रिल 1930 ला बालविवाह प्रतिबंधक कायदा लागू केला. या कायद्यानुसार 21 वर्षाच्या आतील स्त्री पुरूषांना विवाह करण्यास मनाई होती. याचे उल्लंघन केल्यास 300 रुपये दंड व लग्न विधी कारण्याऱ्यास एक महिना साधी कैद अशी शिक्षा होत. रोजंदारीवर काम करणारे कामगार अधिकारी यांची लहान मुलांचे दिवसभर संगोपन करण्यास आज आपण म्हणतो ते डे केअर म्हणजेच शिशु संगोपन केंद्र स्थापन करण्यात आले होते. त्यासाठी 1929 मध्ये संस्थानात शिशु सप्ताह व आरोग्य प्रदर्शन भरविले होते. बाळंतपणासाठी प्रशिक्षित सुईणीद्वारे शास्त्रीय पध्दतीने काळजी घेण्यासाठी “सगुणामाता सुतिका केंद्राची” स्थापना 1928 ला लक्ष्मीबाई राणीसाहेब यांच्या पुढाकाराने झाली.

शेतक-यांच्या प्रश्नाकडे श्रीमंत मालोजीराजे यांनी विशेष लक्ष दिले होते. शेतकऱ्यांच्या कर्ज पुरवठ्यासाठी संस्थानात वेगवेगळ्या सहकारी सोसायट्या स्थापन केल्या होत्या. त्या सोसायट्यांना दि फलटण बॅंक लि. च्या माध्यमातून वित्त पुरवठा होत असे. शेतक-यांना नवनवीन माहिती देण्यासाठी शेतकी प्रदर्शन भरविले जात असे. पाडेगाव येथे ऊसावरील संशोधनास एक संशोधन केंद्र स्थापन केले. त्यावेळी साखरवाडी येथे एक कारखाना कार्यरत होता.

संस्थानच्या प्रशासनात दिवाण हा सरकार चा मुख्य अधिकारी होता. फलटण संस्थानात के. व्ही. गोडबोले यांनी प्रशासन व्यवस्थेत मोलाची कामगिरी केली. हे पद वंशपरंपरेने नव्हते. त्याची निवड गुणवत्तेवर केली जात होती. त्यानंतर कमाविसदार, कलेक्टर, सर्वे अधिकारी, मामलतदार व को-ऑपरेटीव्ह सोसायट्यांवर नियंत्रणासाठी व शेतक-यांच्या मदतीला को-ऑप मामलतदार हे एक पद होते. संस्थानात 1904 मध्ये 2 दिवाणी न्यायालये व 8 फौजदारी न्यायालये अस्तित्वात आली होती. इमारतीच्या उभारणी साठी नियोजन करण्यास संस्थानचे अधिकृत ओव्हरसिअर व इंजिनिअर होते. वजनमापांद्वारे जनतेची फसवणूक होऊ नये म्हणून वजनमापे निरीक्षक हे पद होते. व्यवसाय कर अधिकारी हे देखील व्यवसाय कर गोळा करत. विविध विभागांच्या खरेदी साठी खरेदी अधिकारी हे पद होते. त्याच्या माध्यमातून सर्व खरेदी होत असे. हे सर्व पाहिले तर आपल्याला लक्षात येते की मालोजीराजे यांनी दूरदृष्टीने अगदी त्याकाळात सुध्दा आधुनिक प्रशासन दिले होते. ही सर्व पदे आजदेखील सध्याच्या प्रशासनात अस्तित्वात आहेत.

8 मार्च 1948 रोजी फलटण संस्थान भारतीय संघराज्यात विलीन झालं. त्याचा शोक राजापेक्षा प्रजेनेच अधिक केला. मालोजीराजेंनी हा धाडसी निर्णय घेतला व भारतीय गणराज्याचा सर्वसामान्य नागरिक म्हणून ते आयुष्य व्यतीत करू लागले. संस्थान मुंबई राज्यात विलीन झाल्यावर ते काही काळ मुंबई राज्यात विकास व मजूर मंत्री होते. त्यानंतर सुध्दा त्यांची राजकीय कारकिर्द बहरत गेली. संस्थान विलीन झाले मात्र प्रजेच्या मनातील नाईक निंबाळकर कुटुंबाचे अढळ स्थान मात्र अबाधित राहिलं ते आजतागायत आहे व या पुढे हि कायम राहील.

– अँड. ऋषीकेश काशिद,
बरड, ता. फलटण.
मोबा.: ९१३०७४५९४१


Back to top button
Don`t copy text!