नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिनंदन


दैनिक स्थैर्य । दि. २२ जुलै २०२२ । मुंबई । भारताच्या सर्वोच्च अशा राष्ट्रपती पदावर निवड झाल्याबद्दल श्रीमती द्रौपदी मुर्मू यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केले आहे. ‘श्रीमती मुर्मू यांची निवड भारतीय महिला जगत तसेच आदिवासी समाजाच्या दृष्टीने ऐतिहासिक आणि अभिमानास्पद अशी आहे. हा क्षण आपल्या सर्वांसाठी प्रखर राष्ट्राभिमान जागृत करणारा आनंदी क्षण आहे,’असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री या संदेशात म्हणतात, राष्ट्रपती पदावर श्रीमती द्रौपदी मुर्मू यांची झालेली निवड आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद अशीच आहे. आदिशक्ती म्हणून मातृभक्त, स्त्री शक्ती समोर नतमस्तक होणारी संस्कृती अशी आपल्या संस्कृतीची ओळख आहे. भारताने नेहमीच महिला सबलीकरणासाठी पहिले पाऊल टाकून जगासमोर आदर्श ठेवला आहे. याच परंपरेचा गौरव आणि अभिमान म्हणून श्रीमती मुर्मू यांची निवड ओळखली जाईल. आदिवासी समाजातून येऊनही उच्चशिक्षीत आणि समाजकारणात अग्रभागी राहिलेलं नेतृत्व म्हणून श्रीमती मुर्मू यांची ओळख आहे. त्यांच्या निवडीने आदिवासी समाजालाही सर्वोच्च असा बहुमान लाभला आहे. यातून या समाजाच्या प्रगतीसाठी आणि त्यातील विविध घटकांना विकासाच्या प्रवाहात सामावून घेण्याच्या प्रक्रियेला मोठा हातभार लागणार आहे. श्रीमती मुर्मू आपल्या पदाच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा गौरव वाढवण्यासाठी आणि बलशाली प्रजासत्ताक निर्मितीसाठी महत्वाचे योगदान देतील, हा दृढ विश्वास आहे. त्यांची निवड हा मना मनात प्रखर राष्ट्राभिमान जागृत करणारा क्षण आहे. या निवडीसाठी श्रीमती मुर्मू यांचे मनापासून अभिनंदन आणि त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी आदरपूर्वक शुभेच्छा‌.


Back to top button
Don`t copy text!