
दैनिक स्थैर्य | दि. २९ जून २०२४ | फलटण |
राज्यातील एस.टी.ने प्रवास करणार्यांची संख्या पाहता सध्या राज्य परिवहन महामंडळाकडे असणार्या बसेसची संख्या अपुरी आहे. त्यामुळे राज्यातील जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी नवीन एस. टी. बसेससह जुन्या एस.टी. बस दुरुस्त करून त्याही सुरू कराव्यात, अशी मागणी अॅड. कांचनकन्होजा खरात यांनी फलटण आगारासह फलटणचे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात अॅड. खरात यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या राज्यातील एस. टी. बस व्यवस्थेवरील दुर्लक्षामुळे महाराष्ट्रातील जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कोरोनाच्या संकटात शासनाने प्रवासी वाहतुकीसाठी वापरल्या जाणार्या काही बसेस मालवाहतुकीसाठी वापरल्या. आता कोरोना संपून २ वर्षे झाली तरीही माल वाहतुकीसाठी वापरलेल्या बसेस अजूनही तिकडेच आहेत. त्या बसेस तात्काळ पूर्ववत सुरू कराव्यात, जेणेकरून परत खेड्यापाड्यातील जनतेला प्रवास करण्यासाठी पुरेशा प्रमाणात एस.टी. बसेस उपलब्ध होतील व त्यांचा प्रवास सुलभ होईल. काही ठिकाणच्या बसेस बंद केल्या आहेत, त्या परत चालू होतील. जर या बसेस शासनाला चालू करणे शक्य नसल्यास नवीन बसेस खरेदी करून सुरू कराव्यात.