दैनिक स्थैर्य | दि. 16 जानेवारी 2025 | फलटण | प्रसन्न रुद्रभटे | राज्यात नव्याने २१ जिल्हे निर्माण होण्याबाबतच्या विविध बातम्या आणि सोशल मीडियावर विविध मेसेजेस व्हायरल होणार्या दाव्यांनी नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. या दाव्यांमध्ये पुणे जिल्ह्याचे विभाजन करून बारामती व सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्याचे विभाजन करून माणदेश जिल्ह्याची निर्मिती होणार असल्याचे सांगितले जात आहे.
“स्थैर्य”च्या वतीने विविध शासकीय अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेतून असे समोर आले आहे की, अद्याप जिल्हा निर्मितीबाबत कोणताही नवीन प्रस्ताव तयार करून पाठवण्यात आला नाही. विविध जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की जिल्हा निर्मिती बाबत शासन स्तरावरून निर्णय होऊ शकतो, परंतु अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा, परिपत्रक, आदेश नाहीत.
जर नव्याने जिल्हा निर्मिती झाल्यास, प्रशासकीय दृष्ट्या बारामती जिल्ह्यात फलटण तालुक्याचा समावेश होणे शक्य व सोपे आहे. यामुळे संपूर्ण तालुक्यातील नागरिकांना प्रशासकीय कामकाज करणे सोपे जाणार आहे. मात्र, जर फलटण तालुक्याचा समावेश माणदेश जिल्ह्यात झाला तर, नेमकेपणाने जिल्ह्याचे ठिकाण कोणते असणार हा प्रश्न निर्माण होईल. जर फलटण सोडून मात्र माण किंवा सांगली जिल्ह्यातील कोणत्या गावामध्ये जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण असले तर, नक्कीच फलटण तालुक्यातून यासाठी तीव्र विरोध होऊ शकतो.
जिल्हा निर्मितीबाबतच्या निर्णयाच्या प्रतिक्रिया स्थानिक नागरिक आणि राजकीय नेत्यांकडून येणार आहेत. शासनाकडून अधिकृत घोषणा होण्यापर्यंत नागरिकांना उत्सुकतेने वाट पाहावी लागेल. या निर्णयामुळे प्रशासकीय सुधारणा होण्याची शक्यता आहे, परंतु त्यासाठी सर्व स्तरांवरून समन्वय आणि संवाद आवश्यक आहे.