
स्थैर्य, सांगली, दि. 28: खरेदी विक्री संघांची आर्थिक स्थिती सुधारावी, शेतकऱ्यांना अधिकचे चार पैसे मिळावेत यासाठी खरेदी विक्री संघानी उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यासाठी नवनवीन संकल्पना अंमलात आणाव्यात, असे प्रतिपादन जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी आज केले.
कवठेमहांकाळ तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाच्या नवीन वास्तू व गाळ्यांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे, महांकाली सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन वनिता सगरे, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष सुरूगोंडा पाटील, सहायक निबंधक डी. डी. मोहिते, कवठेमंकाळ नगरपंचायतीचे नगराध्यक्ष पंडित दळवी, मुख्याधिकारी गणेश मोरे आदि मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री जयंत पाटील पुढे म्हणाले, पूर्वी शेतकऱ्याला माल विकण्यासाठी खरेदी विक्री संघाची आवश्यकता भासत होती. त्यामुळे खरेदी विक्री संघाची व्यवस्था निर्माण झाली. पण आताच्या काळात वाहतूकीच्या सोयी निर्माण झाल्या तशा व्यापाऱ्यांच्या कंपन्या आणि संस्था आणि संघटना शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पोहोचल्या आणि ते तिथे स्पर्धा करावयास लागले. त्यामुळे खरेदी विक्री संघास मर्यादा येऊ लागल्या. त्यामुळे या संस्थांच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण झाला. तसेच लोकांच्या गरजाही बदलल्या आहेत. त्यामुळे खरेदी विक्री संघांना उत्पन्नाचे नवनवीन स्त्रोत निर्माण करण्याची आवश्यकता भासली आहे.
सिंचन योजनांमुळे शेतकऱ्यांच्या दारात आता पाणी आले आहे. त्यामुळे शेती उत्पन्नाचे क्षेत्र वाढले. पाण्याची उपलब्धता आता झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी केवळ फळपिके, नगदी पिके हीच न घेता धान्य, डाळी तसेच इतर आवश्यक पिकांचे उत्पादन करावे. यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीची कास धरून जास्तीत जास्त उत्पन्न वाढीवर भर दिला पाहिजे. त्याचबरोबर नवनवीन शोध यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. उत्पादित झालेल्या मालाला चांगली बाजारपेठ मिळणे हे तितकेच आवश्यक आहे, असे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, उत्पादित मालाला चांगली बाजारपेठ मिळण्यासाठी खरेदी विक्री संघ सक्षम होणे आता काळाची गरज झाली आहे. खरेदी-विक्री संघांनी नवनवीन प्रयोग करून आपल्या उत्पन्न वाढीला प्राधान्य दिले पाहिजे. उत्पादित झालेले शेतीचे उत्पन्न आता घर बसल्या मोबाईलवरूनही विकता येते पण यामध्ये शेतकऱ्याची फसवणूक होऊ शकते. त्यामुळे आधुनिकतेकडे जाताना सुरक्षाही महत्त्वाची ठरली आहे. उत्पादकाला सुरक्षितता मिळण्यासाठी खरेदी विक्री संघ महत्वाची भूमिका पार पाडतात.
खरेदी विक्री संघ यांच्यामार्फत शेतमालाची खरेदी विक्री झाली तर त्यामध्ये विश्वासार्हता आहे. यासाठीच खरेदी-विक्री संघाने ग्राहक संस्था, ग्राहक चळवळ अत्याधुनिक पद्धतीने राबवली पाहिजे, असे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, क्रॉपिंग पॅटर्न ठरवून शेतीमालाचे उत्पन्न झाल्यास खरेदी-विक्री संघाना इतर पिकांचीही खरेदी विक्री करणे सोपे होईल. अशाश्वत हवामानाच्या परिस्थितीमुळे आता शेतीही अशाश्वत झाली आहे. वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे शेती पिकावर काही परिणाम होत आहेत. यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर झाला पाहिजे. तसेच कृषि पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून तसेच प्रगतशील कृषिप्रयोग शेतकऱ्यांकडून शेती विषयक ज्ञान आत्मसात करून घेऊन किंवा त्यांचे मार्गदर्शन घेऊन आधुनिकपणे शेती करण्यावर भर द्यावा. शेतकऱ्यांनीही मुलांना शेतीपूरक अभ्यासक्रम निवडण्यासाठी प्रेरित केले पाहिजे. लोकांना चार पैसे जास्त मिळतील यासाठी शेतीविषयक अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनीही यावर भर दिला पाहिजे. आधुनिक शेती हीच आपल्याला भविष्यात वाचवू शकते.
प्रास्ताविकात चंद्रशेखर म्हणाले, कवठेमहांकाळ व आजूबाजूच्या खेडेगावातील शेतकऱ्यांच्या मालाला योग्य मिळावा यासाठी 1962 साली या संस्थेची स्थापना केली. या संस्थेची वाटचाल आधुनिकतेकडे सुरू असून या संस्थेने सुमारे 65 लाख रूपये खर्चून नवी इमारत व कायमस्वरूपी उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण व्हावा यासाठी नवीन गाळे निर्माण केले आहेत.
प्रारंभी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते कवठेमंकाळ शेतकरी खरेदी विक्री संघाच्या नवीन वास्तूचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कवठेमंकाळ शेतकरी सहकारी कारखान्याच्या चेअरमन वनिता सगरे, माजी राज्यमंत्री अजित घोरपडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. स्वागतात शेतकरी खरेदी-विक्री संघाचे चेअरमन सुरूगोंडा पाटील यांनी खरेदी-विक्री संघाच्या वाटचालीबाबत माहिती दिली. आभार उपनगराध्यक्ष तथा संचालक अय्याज मुल्ला यांनी मानले.