‘आर. के.’ नावाची अधुरी कहाणी….

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०६ डिसेंबर २०२१ । फलटण । फलटण तालुक्यातील राजाळे येथील पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते आर. के. निंबाळकर यांचा आज सोमवार, ६ डिसेंबरला प्रथम स्मृतिदिन. त्यानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना दिलेला उजाळा….

खरेतर आर. के. निंबाळकर यांची मैत्री आम्ही दोघेही सकाळ वृत्तसमूहामध्ये कार्यरत असताना जमली, आणि विचारधारेबरोबरच परस्परांच्या सुख -दुःखामध्ये सहभागी झाल्याने ती अधिक घट्ट झाली. वास्तविक राजाळेसारख्या ग्रामीण भागात व्याख्यानमाला, आरोग्य शिबिरे, शिवजयंती, नेहरू युवा मंडळ आदींच्या माध्यमातून समाजकार्याकडे वळलेला रवींद्र किसनराव निंबाळकर नावाचा शेतकरी कुटुंबातला एक पदवीधर ‘स्थैर्य’चे संपादक स्व. दिलीप रुद्रभटे, दैनिक ऐक्यचे ज्येष्ठ प्रतिनिधी अरविंद मेहता आदींच्या मार्गदर्शनाखाली पत्रकारितेकडे ओढला गेला, आणि समाजाला न्याय मिळवून देणारी कृषी संस्कृतीचे गोडवे गाणारी, इतिहासात रमणारी, भविष्याचा वेध घेणारी आणि समाजाला उपयोगी पडणारी बातमीदारी हाच त्याच्या जीवनाचा मूलमंत्र ठरला, मात्र केवळ स्वतःपुरतेच पाहणाऱ्यांच्या स्वार्थी जगात त्यांचा टिकाव लागला नाही आणि ते पत्रकारितेच्या वर्तुळातून बाहेर पडले. मात्र त्यांच्यातील तळमळीचा बातमीदार कधीही थांबला नाही व गप्पही बसला नाही. शारीरिक, मानसिक व आर्थिक बाबींमध्ये ते बॅकफूटवर गेले. परंतु सतत विविध प्रयोग करण्याची वृत्ती, जीवनाकडे पाहण्याचा आशावादी दृष्टिकोन ही त्यांची बलस्थाने होती. बेकरी व प्रोव्हिजन स्टोअर्स सुरू करण्याचा प्रयोग असो, किंवा फलटण दिनांक दिनदर्शिकेची निर्मिती असो, हेल्थ डायरीच्या प्रसिद्धीसाठी त्यांनी घेतलेली मेहनत त्यांच्या जिद्दी व समाजशील वृत्तीचा परिपाक होता.

कोणीही अडचणीत असेल तर त्याच्या मदतीला धावणारा हा सर्व सत्वशील व संवेदनशील मनुष्य कर्करोगाशी झुंज देताना मात्र एकाकी पडला आणि मनानेही खचला. कुटुंबीय आणि मित्रमंडळींनी त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला मात्र जीवनाची लढाई जगताना अर्ध्यावरती डाव मोडून वर्षभरापूर्वी आर. के. देवाच्या घरी गेले. त्यांच्या जाण्याने व्यक्तीगत त्यांच्या कुटुंबावर तर आघात झालाच, मात्र त्यांच्या जाण्याने समाजाचेही मोठे नुकसान झाले आहे. ‘फलटण गॅझेट’ व ‘मराठा आयडॉल्स फलटण’ हे त्यांचे दोन प्रकल्प त्यांच्या अकाली निधनाने ठप्प झाले, मात्र ते पूर्णत्वास नेणे आणि त्यासाठी प्रयत्न करणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल. उपरोक्त दोन्ही प्रकल्पांसाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली होती. त्यासाठी संबंधित क्षेत्रातील अभ्यासक व तज्ञांसोबत ते सातत्याने संपर्क करायचे. माझ्याशी तर सामाजिक कौटुंबिक व करिअरविषयक विविध विषयांवर सतत बोलत रहायचे. दिवसातून अक्षरशः पाच-सहा वेळा आमचे फोन व्हायचे. कामाच्या व्यापातून मी कधी फोन उचलला नाही तर कधीही ते रागवत नव्हते. माझ्या प्रत्येक सुख -दुःखाच्या प्रसंगात ते आवर्जून विचारपूस करायचे. ‘मित्रप्रेम जपावे कसे?’ हे शिकावे तर आर. के. निंबाळकर यांच्याकडूनच. त्यांच्या अंतिम दिवसात मी स्वतः फोन करूनही त्यांच्याशी फोनवर बोलता आले नाही; आणि माझा हा जिवलग मित्र न बोलताच या जगातून निघून गेला हीच राहून राहून खंत वाटते. त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकालाच ‘आर. के. नावाची अधुरी कहाणी’ बेचैन करून सोडते, एवढे मात्र खरे. आर के निंबाळकर नावाच्या प्रयोगशील, सत्यशील व संवेदनशील आणि आणि प्रामाणिक मित्राला भावपूर्ण श्रद्धांजली.

– जयंत लंगडे, सातारा


Back to top button
Don`t copy text!