नीरा उजवा कालव्याचे अस्तरीकरण होणे आवश्यक : तानाजी गावडे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २९ जुलै २०२३ | फलटण |
नीरा उजवा कालव्याला तब्बल शंभर वर्षांहून अधिक काळ झाला आहे. त्याचे अस्तरीकरण होणे गरजेचे असल्याचे स्पष्ट करीत त्यातून मोठ्या प्रमाणावर होणारी पाण्याची गळती रोखणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. येणार्‍या काळात पाणी वाचविले नाही तर त्याची मोठी किंमत सर्व शेतकर्‍यांना मोजावी लागेल, असे मत ज्येष्ठ मार्गदर्शक तथा बागायतदार तानाजी गावडे यांनी मांडले. पाण्याची बचत होऊन सर्वांपर्यंत पाणी पोहोचले पाहिजे, असेही ते यावेळी म्हणाले.

नीरा उजवा कालवा अस्तरीकरण झाले पाहिजे यासाठी जनजागृती व अस्तरीकरण समर्थनात आज खुंटे (ता. फलटण) येथे भैरवनाथ मंदिर सभा मंडपात शेतकर्‍यांची बैठक झाली. त्यावेळी गावडे बोलत होते. विश्वासदादा गावडे, संतोष खटके, बजरंग गावडे, दादासाहेब खटके तसेच खुंटे पंचक्रोशीतील शेतकरी या बैठकीला उपस्थित होते.

यावेळी बोलताना तानाजी गावडे यांनी सांगितले की, आम्ही कोणाच्याही विरोधात अथवा कोणत्याही पक्षाच्या विरोधात नाही. आम्हाला शेतकर्‍यांचे हित जोपासायचे असल्याने व खरोखरच येणार्‍या काळात पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रयत्न करीत आहोत. अस्तरीकरण झालेच पाहिजे, या चळवळीत शेतकर्‍यांची जनजागृती व पुढे शेतीसाठी पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी आम्ही तुम्हाला त्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी इथे आलो आहे, असे स्पष्ट करीत त्यांनी सांगितले की, या कालव्याची निर्मिती इंग्रजांनी केली असून त्याला आता शंभर वर्षे होऊन गेली आहेत. त्यामुळे पुढे कालव्याला कोणताही धोका निर्माण होऊ नये व पाण्याची टंचाई भासू नये यासाठी या कालव्याचे अस्तरीकरण झाले पाहिजे. येणार्‍या काळात हे अस्तरीकरण होण्यासाठी शासन स्तरावर किंवा न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्यात येतील, असेही ते म्हणाले.

दरम्यान, यावेळी बोलताना श्रीराम सहकारी साखर कारखाना संचालक संतोष खटके यांनी सांगितले की, या निरा उजवा कालव्यातून तब्बल १५ टक्के पाण्याची गळती होत आहे, तर अनेकजण पाणी चोरून वापरत असून त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे. पाण्याची बचत व योग्य पाणीपुरवठा व्हावा म्हणून गावागावात पाणी वापर संस्था स्थापन करण्यात आल्या आहेत. तरीही पाणी चोरी जास्त होत असल्याने ही पाणी चोरी रोखायची असेल तर अस्तरीकरण झाले पाहिजे.

यावेळी बोलताना बजरंग गावडे यांनी सांगितले की, आपण आता जागे झालो नाही तर आपल्या जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण होईल. पाणी मिळाले नाही तर आपल्या शेतात वेडीबाभळ उगवेल. त्यामुळे आपल्या हक्काचे पाणी आपल्याला मिळालेच पाहिजे आणि ते मिळण्यासाठी आपल्याला घरातील महिला-मुलांसह संबंधित विभागावर मोर्चा काढावा लागेल. संघर्ष समिती निर्माण करून मोठी चळवळ उभी करावी लागेल. आपण आत्ता हा विषय समजून घेतला अथवा इतर शेतकर्‍यांना सांगितला नाही तर आपण बागायतीचे जिरायती होऊ, अस्तरीकरण नसल्याने फार पाण्याचे लिकेज वाढलेत, अनेक ठिकाणी मातीचा भरावा खराब झालाय तसेच खचलाय, अस्तरीकरण झाले तर १८ ते २० टक्के पाणी वाचणार आहे व ते पाणी सर्वांना शेतीसाठी मिळणार आहे, येणार्‍या काळात अस्तरीकरण झाले पाहिजे, अशी मागणी शासन दरबारी मांडण्यासाठी आपली एकजूट दाखवणे गरजेचे असल्याचे बजरंग गावडे यांनी सांगितले आहे.

भैरवनाथ मंदिर खुंटे येथे झालेल्या या बैठकीत आलेल्या मान्यवरांचे शब्दसुमनांनी स्वागत खुंटे विकास सेवा सोसायटीचे चेअरमन अविनाशकाका खलाटे यांनी केले. यावेळी ज्येष्ठ नेते दिलीपराव खलाटे, जालिंदर खलाटे व शिंदेवाडी, कांबळेश्वर व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!