दैनिक स्थैर्य | दि. ४ ऑगस्ट २०२३ | फलटण |
निरा देवघर धरण ३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ९४ % भरले आहे. वीर धरण ८४ % भरले आहे. असाच पाऊस दोन-तीन दिवस राहिला तर नीरा देवघर धरणातून विसर्ग सुरू करावा लागेल. तो विसर्ग थेट वीर धरणात येत असल्याने वीर धरण भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे पूर नियंत्रण करण्यासाठी वीर धरणातून पाणी सोडावे लागू शकते, अशी माहिती तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी दिली.
वीर धरणातून पाणी सोडण्यात येण्याच्या पार्श्वभूमीवर नीरा नदीच्या पात्रात कुठल्याही विभागाचे काम सुरू असेल तर त्या विभागाने बांधकाम साहित्य व कामगार यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावे. तसेच नीरा नदीच्या काठावरील सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात यावा, असे आदेश तहसीलदार डॉ. जाधव यांनी प्रशासनाला दिले आहेत.
नीरा नदी भीमा नदीला मिळाल्यानंतर भीमा नदीच्या काठावरीलही सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात यावा, असेही त्यांनी सांगितले आहे. तसेच नदीपात्रात पिण्याच्या व शेतीसाठी असलेले पंप सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावेत, पाणी सोडण्यात आल्यानंतर कोणीही नदीपात्रात जावू नये, असे आवाहनही तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी केले आहे.