ग्रंथालय चळवळीला बळ देण्याची गरज

श्रीधर कंग्राळकर; अश्वमेध ग्रंथालयाच्या श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) ग्रंथालय पुरस्कारांचे वितरण


सातारा – पुरस्कार विजेत्यांना सोबत श्रीधर कंग्राळकर, रविंद्र भारती, डॉ. राजेंद्र माने, प्रा. श्रीधर साळुंखे

स्थैर्य, 19 जानेवारी, सातारा : आज डिजिटल युगात आपण सगळे मोबाईलमध्ये हरवलो आहोत. पण पुस्तकाचा जो सुगंध असतो आणि पानांमधून मिळणारा जो अनुभव असतो, तो स्क्रीनवर कधीच मिळत नाही. लेखक, कवी यांची पुस्तके वाचकांपर्यत पोहचवण्याचे काम ग्रंथपाल आणि ग्रंथालय कर्मचारी करत असतात. आजच्या काळात वाचनालये चालवणे हे मोठे आव्हान आहे, तरीही अश्वमेध ग्रंथालयाने हा पुरस्कारांचा उपक्रम राबवून या क्षेत्रात काम करणार्‍यांना बळ दिले आहे, असे प्रतिपादन बांधकाम व्यावसायिक श्रीधर कंग्राळकर यांनी केले.
येथील अश्वमेध ग्रंथालय व वाचनालयाच्यावतीने देण्यात येणार्‍या श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) ग्रंथालय पुरस्कारांच्या वितरणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ग्रंथालयाचे संस्थापक रवींद्र भारती, अध्यक्ष डॉ. राजेंद्र माने, कार्यवाह शशिभूषण जाधव, उपाध्यक्ष डी.एम. मोहिते, संचालक प्रा. श्रीधर साळुंखे उपस्थित होते.

कार्यक्रमात (कै.) ग्रंथमित्र डॉ. शिवाजीराव चव्हाण स्मृत्यर्थ उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार श्री. रामदास मोफत वाचनालय, शिरवळ, (ता.खंडाळा), (कै.) कवी आनंदा ननावरे स्मृत्यर्थ उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार कर्‍हाड येथील सुरुची महिला ग्रंथालयाचे अध्यक्ष डॉ. शर्वरी बेलापूरे, (कै.) वसंतराव बयाजी निकम स्मृत्यर्थ उत्कृष्ट ग्रंथालय कर्मचारी पुरस्कार बोरगाव (ता. कर्‍हाड) येथील बाळसिद्ध वाचनालयच्या ग्रंथपाल अर्चना घाडगे, (कै.) डॉ. शीतल देशमुख स्मृत्यर्थ उत्कृष्ट वाचक पुरस्कार व्यंकट लोकरे यांना दोन हजार रुपये रोख, शाल आणि ग्रंथ देऊन सन्मानित करण्यात आले.

रवींद्र भारती म्हणाले, ग्रंथपाल आणि ग्रंथालय कर्मचारी हे खर्‍या अर्थाने समाजाचे ’वाटाडे’ आहेत. वाचकाला योग्य पुस्तक सुचवणे, हे एका उत्तम मार्गदर्शकाचे काम आहे. आपण आपल्या घरात एक छोटी का होईना पण लायब्ररी केली पाहिजे. मुलांना मोबाईल देण्याऐवजी एखादं छान पुस्तक हातात दिलं, तर पुढची पिढी अधिक सुसंस्कृत होईल. ग्रंथ चळवळ वृद्धिंगत करण्यासाठी आपण सर्वांनी या वाचनालयांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला हवं.

डॉ. राजेंद्र माने म्हणाले, व्यवसायाने बांधकाम व साहित्याचे अतूट नातं आहे. प्रत्यक्षात इमारत उभी राहण्यापूर्वी ती कागदावर उभी राहत असते. आपण जेव्हा इमारत उभी करतो, तेव्हा ती विटा आणि सिमेंटची असते, पण माणसाचं व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी विचारांची आणि वाचनाची इमारत उभी करावी लागते; आणि हे काम ’अश्वमेध’ सारखी ग्रंथालये गेली नऊ वर्षे सातत्याने करत आहेत.

रवींद्र भारती यांनी प्रास्ताविक केले. वैद्यही कुलकर्णी यांनी सूत्रसंचलन केले. प्रा. श्रीधर साळुंखे यांनी आभार मानले. यावेळी डॉ. मोहन सुखटणकर, गौतम भोसले, नंदा जाधव, सुनीता कदम, डॉ. सुतेजा दांडेकर, शामल जोशी, राजू निकम, दीपक ननावरे, पोपटराव मोरे, गौरव इमडे, संजय साबळे, निलेश पवार व साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!