दैनिक स्थैर्य । दि. २८ डिसेंबर २०२१ । सातारा । ‘’विज्ञानशक्तीमुळे नवीन विचार व तंत्रज्ञान आज समोर येत आहे. नव्या पिढीची जबाबदारी घेण्याचे आव्हान आपल्या समोर आहे.रयतच्या इंजिनियरिंग कॉलेजमध्ये या पुढच्या काळात आर्टीफिशीयल इंटेलिजंस हा विषय सुरु करण्याची गरज आहे.रयत शिक्षण संस्था येणाऱ्या काळात हे आव्हान स्वीकारणार आहे.यासाठी महाराष्ट्रातील अनेक तज्ञांची मते घ्या,मी त्यांची भेट घालून देईन अण्णांनी ज्या गोष्टी आपल्याला शिकविल्या त्याची हल्लीच्या पिढीला पार्श्वभूमी माहीत नाही. अण्णांच्या सानिध्यात यायची संधी आपल्याला मिळाली नाही तरीही आपण आधुनिकता आणि विज्ञान घेऊन कर्मवीरांच्या विचारांचे पाईक व्हायला हवे. कोणतेही व्यक्तिमत्व घडायचे असेल तर माता,माती,आणि मातृभूमी याबद्दल आस्था असायला हवी. यातूनच राष्ट्रीय गरजांची पुरती होईल महात्मा फुले ,राजर्षी शाहू महाराज,अण्णा,आंबेडकर ,गाडगेबाबा यांचा आधुनिक आणि नवी दृष्टी आपण रुजवली पाहिजे .इंग्रज राजाला महात्मा फुले यांनी नवी दृष्टी दिली होती . दुष्काळाच्या काळात खडी फोडायचे काम न देता पाण्याचा थेंब न थेंब वाचवून पाण्याची पातळी वाढवली पाहिजे .निसर्गाचा असमतोल थांबण्यासाठी वृक्षवाढ केली पाहिजे,या भागातील शेतकरी सतत शाळूचे पिक घेतो त्यामुळे मातीचा कस कमी होतो त्यासाठी विलायत आणि देशी यांचे संकरित वाण तयार केल्यास उत्पन्न वाढेल गायीचा पूर्वीचा धंदा सोडून संकरित गायी तयार कराव्यात त्यामुळे भरपूर दुध मिळेल असे महात्मा फुले यांनी सांगितले होते. कर्मवीर अण्णा यांना फुल्यांची विचारधारा पटली होती .नवी पिढी याच विचाराने पुढे गेली पाहिजे .आपल्याला नव्या जगातील आधुनिक विचारधारा नजरेसमोर ठेवून पुढे जाण्याची गरज आहे.’’’असे मत रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि देशाचे माजी केंद्रीय कृषी मंत्री शरदरावजी पवार यांनी मांडले .ते येथील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये नव्याने बांधलेल्या ‘’लोकनेते रामशेठ ठाकूर भवन च्या उद्घाटन समारंभात अतिथी म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ.अनिल पाटील होते .मा.खासदार श्रीनिवास पाटील, संस्थेचे व्हाईस चेअरमन अॅड.भगीरथ शिंदे, लोकनेते रामशेठ ठाकूर ,सौ.शकुंतला ठाकूर ,मीनाताई जगधने,प्राचार्य डॉ.विठ्ठल शिवणकर ,मानेन्जिंग कौन्सिलचे सदस्य इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
रामशेठ ठाकूर यांनी छत्रपती शिवाजी कॉलेजला लोकनेते रामशेठ ठाकूर भवन ही इमारत बांधून दिल्याबद्दल मा.पवार साहेब यांनी रामशेठ व त्यांच्या पत्नी शकुंतला यांचा सत्कार केला. यावेळी रामशेठ ठाकूर यांनी व शंकुतला ठाकूर यांनी सव्वा कोटी प्रमाणे अडीच कोटीचा चेक मा.शरद पवार यांचेकडे देणगी म्हणून सुपूर्त केला.रामशेठ यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले की ‘’रामशेठ हे खऱ्या अर्थाने रयतचे हितचिंतक आहेत. संस्थेला ज्यावेळी गरज पडते त्याबेळी त्यांच्या मुखातून कधीच नकार येत नाही. रायगड जिल्हा हा पुरोगामी विचाराचा जिल्हा आहे .या जिल्ह्यात अनेक पुरोगामी कार्यकर्ते होऊन गेले .रामशेठचे नाव घेतल्याशिवाय रायगडला पूर्णत्व नाही. रामशेठ यांनी कोणकोणत्या शाखांना कोटी रुपये दिले त्याची यादीच त्यांनी वाचून दाखवली.
मा.श्रीनिवास पाटील म्हणाले की ‘’जोडोनिया धन उत्तम व्यवहारे ,उदास विचारे वेच करी हे जीवन रामशेठ यांचे आहे. शरदरावजी पवार व रामशेठ ठाकूर यांच्या कार्याचा त्यांनी आढावा घेतला. मनोगतात रामशेठ ठाकूर म्हणाले की ‘’रयत शिक्षण संस्था हे माझे घर आहे. गव्हाणला रयत शिक्षण संस्थेचे हायस्कूल नसते तर आम्ही मातीत राहिलो असतो. गव्हाण मधील 4 व छत्रपती शिवाजी कॉलेज मधील 4 अशी ८ वर्षे मी रयत शिक्षण संस्थेत घेतले. रयतच्या सहाय्याने आमचे जीवन उजळले .कर्मवीर अण्णा यांची कृपादृष्टी आम्हाला लाभली .राम चा रामशेठ झाला.मी ८८-८९ साला पासून रयतच्या कार्यक्रमाला येतो.एक काळ मी साताऱ्याला छत्रपती शिवाजी कोलेजच्या वसतिगृहात शिकत होतो तेंव्हा गावी गेल्यावर माझा सदरा लेंगा पाहून मला घाटी मामा आला म्हणून हसत.पण माझे असे होते की शिकता येईल तेवढे शिकावे.अण्णांच्या संस्थेत पवार साहेबांचा आदर्श मिळाला. तसेच कॉलेजमध्ये त्यावेळी आमचे प्राचार्य उनउणे बापू होते.कोणत्याही विद्यार्थ्याची अडचण असेल तर बापू पैसे द्यायचे .त्यांची विद्यार्थ्याविषयी असणारी आपुलकी आमच्या डोक्यात बसली. पुढे तोच किता आम्ही गिरवला .सामाजिक शिक्ष्निक कामासाठी मदत करणे हे मोठे काम असते.निवडणुक नसताना मदत करावी.लेबर स्कीम चे दिवस आम्हाला घडवणारे होते.यातूनच कष्टाची सवय आम्हाला लागली.कोलेजच्या इमारतीसाठी आम्ही खडी फोडली होती.मी दोनदा खासदार झालो पण मी कुणाला हरवले नाही .दि.बा.पाटील ,अंतुले साहेब यांच्या पायाशी मी गेलो.त्यांचेकडून शिकलो .गावात आठ आणे मजुरीवर काम करणारा मी सामान्य माणूस होतो.शिक्षक झालो .उद्योगपती झालो .खासदार झालो. पवार साहेबांच्या सोबत झालेला हा कार्यक्रम माझ्या आठवणीतल्या पाच दहा महत्वाच्या कार्यक्रमात समाविष्ट आहे .आज क्लस्टर युनिव्हर्सिटी होत आहे .यासाठी देखील मी सहयोग देईन असे त्यांनी सांगितले
अध्यक्षीय भाषणात डॉ.अनिल पाटील यांनी कर्मवीरांचा काळ,यशवंतराव चव्हाण यांचा काळ ,वसंतदादा पाटील यांचा काळ आणि अध्यक्ष म्हणून असलेला शरदराव पवार यांचा काळ यांचा आढावा घेऊन सर्वांनी दिलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली व रयतच्या पुढच्या प्रकल्पाबद्दल बोलताना ते म्हणाले की कर्मवीरांनी त्या काळात अनेकांना परदेशी शिक्षण घेण्यासाठी पाठवले तसेच रयत शिक्षण संस्था आता पवार साहेबांच्या नावाने परदेशी शिक्षण घेण्यासाठी पोस्ट डॉक फेलोशिप देईल .आमच्या रयत शिक्षण संस्थेत अशी दोन माणसे आहेत की त्यांच्यामुळे मोठमोठे प्रकल्प उभे राहतील याची आम्हास खात्री असते.छत्रपती शिवाजी कॉलेज कसे उभे राहिले त्या घटना सांगून ते पुढे म्हणाले की छत्रपती शिवाजी कोलेजच्या प्रत्येक इमारतीस पुण्यवान माणसांचे हात लागले आहेत.रामशेठ ठाकूर भवनमुळे आमचे यु.पी.एस.सी ,बी.व्होक कोर्स अतिशय चांगल्या रीतीने चालतील.’’
समारंभाच्या प्रारंभी प्रा.संभाजी पाटील व सहकारी यांनी रयत गीत गायन केले .रयत शिक्षण संस्थेचे सचिव व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विठ्ठल शिवणकर यांनी प्रास्ताविक केले. या कार्यक्रमात लोकनेते रामशेठ ठाकूर भवन चे आर्किटेक्ट सौरभ महामुलकर ,कंत्राटदार विजय जाधव ,प्रशासकीय इमारतीचे इंटेरियर ज्यांनी केले ते सुहास धर्माधिकारी,व्हर्टिकल गार्डन विनामुल्य तयार करून देणारी कॉलेजचे माजी विद्यार्थी फिरोज मेटकरी.आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेकडून दखल घेतलेल्या दिपाली गोडसे ,अस्वस्थ दिवसांची सुगी कवितासंग्रह लिहिणाऱ्या कविता म्हेत्रे यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे आभार उपप्राचार्य डॉ.अनिल वावरे यांनी मानले तर सूत्रसंचालन प्रो.डॉ.सविता मेनकुदळे यांनी केले .या समारंभास लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे कुटुंबीय ,रयतच्या मानेन्जिंग कौन्सिलचे सदस्य प्रभाकर देशमुख ,चंद्रकांत दळवी ,अॅॅड.रविंद्र पवार ,एम.बी.शेख ,के.के .घाडगे ,प्राचार्य आर.डी.गायकवाड ,राजेंद्र फाळके ,अॅड.दिलावर मुल्ला, सहसचिव प्राचार्या डॉ.प्रतिभा गायकवाड ,ऑडीटर प्राचार्य डॉ.शिवलिंग मेनकुदळे ,सहसचिव संजय नागपूरे, विविध महाविद्यालयाचे प्राचार्य ,प्राध्यापक ,विद्यार्थी,पत्रकार इत्यादी उपस्थित होते .