आंतरराष्ट्रीय जैव विविधता दिनानिमित्ताने पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करण्याची गरज – केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव


दैनिक स्थैर्य । दि. २३ मे २०२३ । मुंबई । आंतरराष्ट्रीय जैव विविधता दिनाच्या निमित्ताने पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी केले.

मुंबईत आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनानिमित्त आयोजित एका विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे, पर्यावरण, वने आणि हवामान बदल विभागाच्या सचिव लीना नंदन, राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणाचे अध्यक्ष सी. अचलेंद्र रेड्डी, केंद्र आणि राज्य शासनाचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री श्री. यादव म्हणाले, आपण नेहमी  पर्यावरणातून सर्वोत्तम गोष्टी उचलतो आणि कचरा परत देतो, विकासाबरोबरच आपला वापर देखील वाढला आहे.

जर आपण अनावश्यक वापराला  प्रोत्साहन देत राहिलो  तर एक पृथ्वी देखील पुरणार नाही. आगामी काळात विकासाबरोबरच जैवविविधतेचे संवर्धन करण्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगून त्यांनी मिशन लाइफअंतर्गत प्रत्येक गावात  जैवविविधता नोंद पुस्‍तक तयार  करण्याची कल्पना मांडली.

महाराष्ट्र शासनाच्या अनोख्या ‘जीन’  बँक उपक्रमाचे अभिनंदन करून मंत्री श्री. यादव म्हणाले की, “महाराष्ट्रात वसलेला पश्चिम घाट जैवविविधतेने समृद्ध आहे. महाराष्ट्रात सहा राष्ट्रीय उद्याने, 48 वन्यजीव अभयारण्ये आणि तीन रामसर स्थळे आहेत. म्हणूनच आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन साजरा करण्यासाठी यापेक्षा उत्तम  जागा असूच शकत नाही.”

या वर्षीच्या जागतिक पर्यावरण दिनाच्या संकल्पनेबद्दल बोलताना मंत्री श्री. यादव म्हणाले, पर्यावरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम मिशन लाइफ (LiFE) बरोबर जोडण्याची मंत्रालयाची योजना आहे. निसर्ग आणि पर्यावरण हे आपल्या जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचे घटक आहे. मिशन लाईफ अंतर्गत, ‘संपूर्ण समाज’ हा दृष्टिकोन अंगीकरण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असे श्री. यादव म्हणाले.

भरडधान्यांचे महत्त्व सांगताना केंद्रीय मंत्री श्री. यादव म्हणाले की, “भरडधान्ये ‘व्होकल फॉर लोकल’ च्या भावनेला चालना देतात. हे पीक भारतीय हवामान आणि मातीसाठी अनुकूल आहे. दुष्काळ प्रतिरोधक असण्याबरोबरच, भरड धान्ये पोषणाची कमतरता कमी करण्यासाठी महत्त्वाची आहेत. जैवविविधता मंडळाने भरड धान्यांना विशेष महत्व दिले आहे. असुरक्षित समुदायाला सहज उपलब्धता आणि लाभ मिळावा, हे याचे उद्दिष्ट आहे.”

पर्यावरण रक्षण हा देशासाठी श्रद्धेचा विषय असल्याचा मंत्री श्री. यादव यांनी पुनरुच्चार केला. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, आपल्या आधीच्या पिढीने संरक्षण केल्यामुळे आपल्याला नैसर्गिक साधन संपत्ती उपलब्ध आहे. येणाऱ्या पिढ्यांसाठी त्याचे संरक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. हा सर्वात महत्त्वाचा संदेश आहे”.

यावेळी पर्यावरण, वने आणि हवामान बदल राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे म्हणाले की, “जर आपण पर्यावरणाचे रक्षण केले तर त्या बदल्यात पर्यावरण आपले रक्षण करेल. आपण पर्यावरणाकडून जेवढे घेतो तेवढे परत दिले नाही तर निसर्गाचा समतोल बिघडेल आणि आपल्याला नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागेल. निसर्ग जगला, तर आपण जगू आणि पृथ्वी जगेल.”

भरडधान्यांचा संदर्भ देत मंत्री श्री. चौबे पुढे म्हणाले की, “भारताच्या पुढाकारामुळे आज संपूर्ण जग भरड धान्याकडे आकर्षित झाले आहे. लोकचळवळीच्या माध्यमातून आपल्याला भरड धान्य विषयीचे ज्ञान, मागणी आणि पुरवठा वाढवायचा आहे. आपण एक लोकचळवळ निर्माण करून भरड धान्य विषयीचे ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवायला हवे.” यावेळी मंत्र्यांनी ‘निसर्ग, संस्कृती आणि साहित्याला उज्वल भविष्याकडे नेण्याचा मंत्र दिला.

पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाच्या सचिव  लीना नंदन म्हणाल्या की, आपले जीवन मुख्यत्वे जैवविविधतेवर अवलंबून आहे हे आजच्या दिवशी आपण मान्य करतो.

राज्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही व्हिडिओ संदेशाद्वारे उपस्थितांना संबोधित केले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाच्या ‘जैवविविधता हेरिटेज साइट्स ऑफ इंडिया’ आणि ‘अदर इफेक्टिव्ह एरिया बेस्ड मॅनेजमेंट’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.

केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी भरड धान्यावर आधारित विशेष लक्ष केंद्रित करून भरवण्यात आलेल्या जैवविविधता प्रदर्शनाचे उद्घाटन केले. या प्रदर्शनात महाराष्ट्र शासनाचा वन विभाग, राज्य जैवविविधता मंडळ, महाराष्ट्र जीन बँक प्रकल्प, भारतीय वनस्पती सर्वेक्षण आणि इतर अशा विविध संस्थांचे कार्य प्रदर्शित करण्यात आले. भरड धान्याला प्रोत्साहन देण्यासाठी सहभागी असलेल्या विविध सार्वजनिक आणि खाजगी संस्थांनी देखील या प्रदर्शनाचा सहभाग घेतला होता.


Back to top button
Don`t copy text!