दैनिक स्थैर्य | दि. 04 जून 2023 | मुंबई | पर्यटन क्षेत्र म्हणून झपाट्याने विकसित होत असताना विकासाबरोबर अलिबागमध्ये काही नवीन प्रश्न निर्माण झाले आहेत. समस्यांचे स्वरूप गंभीर तर आहेच त्याचबरोबर स्थानिक भूमिपुत्रावर अन्याय करणारे सुद्धा आहेत. मुंबईतील मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई या संस्थेने अलिबागमध्ये यायचे आणि इथल्या समस्यांचा आढावा घ्यायचा हे योग्य नव्हे, अलिबागच्या समस्या स्थानिकांनीच सोडवण्यासाठी कार्यरत राहायला हवे असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार जयंत धुळप यांनी केले. वृत्तपत्र लेखक संघाच्या चळवळीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संस्थेचे पदाधिकारी अलिबाग येथील नागाव येथे चर्चात्मक संवाद आयोजित केला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाध्यक्ष रवींद्र मालुसरे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षा सौ सुजाता पाटील, सामाजिक कार्यकर्ते आणि प्रभादेवीतील शाखाप्रमुख संजय भगत, दैनिक कृषीवलच्या डिजिटल आवृत्ती संपादक माधवी सावंत उपस्थित होते.
धुळप पुढे असेही म्हणाले की, तालुक्याचा विकास किती झाला आहे याचे आत्मपरीक्षण अलिबागवासियांनी करणे गरजेचे आहे. त्यानंतर समस्या का सुटत नाही याचा पाठपुरावा करण्यासाठी नागरिकांनी मुखदुर्बलता सोडून निर्भीडपणे सोशल मीडियाचा वापर करायला हवा, नगरपालिकेतील तक्रार यंत्रणेत नोंद करण्याची प्रक्रिया सुरु झाली तर त्या निवारण करण्यासाठी संबंधित यंत्रणा हळू लागेल. त्याचबरोबर शासनाच्या नियोजन खात्याला अर्थसंकल्पात तशी तरदूत करणे सोपे जाईल.
सौ सुजाता पाटील या आपले विचार व्यक्त करताना म्हणाल्या की, स्थानिकांनी आणि शहरात येणाऱ्या पर्यटकांनी पर्यटनाबरोबर पर्यावरणाची काळजी घ्यायला हवी. गांभीर्यपूर्वक निसर्गसंवर्धनाचा वसा प्रत्येकाने घ्यायला हवा. त्याचबरोबर अलिबागमध्ये हॉटेल मॅनेजमेंट वा कॅटरिंग कॉलेज सुरु होणे गरजेचे आहे, हे झाले तर त्यानंतर स्थानिक भूमिपुत्र फक्त टेबलावर फडके मारण्याचे काम न करता त्यांना संधी उपलब्ध झाली तर त्यांची आर्थिक सुबत्ता वाढण्यास मदत होईल. तालुक्याच्या विकासासाठी पायाभूत सुविधा तयार होताना लोकांना काय हवे यादृष्टीकोनातून नियोजन होणे गरजेचे आहे. संजय भगत यांनी अलिबाग तालुक्यातील अंतर्गत रस्ते, पाण्याचा दुष्काळ, परप्रांतीयांचे आक्रमण याबाबत अभ्यासपूर्ण विचार मांडले. कार्यक्रमाला उपस्थित असलेले स्थानिक लेखक, पत्रकार यांनी सुद्धा आपले विचार यावेळी निर्भीडपणे मांडले.
संघाचे कार्यवाह नितीन कदम यांनी सूत्रसंचालन तर आभार प्रदर्शन माजी अध्यक्ष मनोहर साळवी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्याध्यक्ष रमेश सांगळे यांच्या नेतृत्वाखाली माजी अध्यक्ष विजय कदम, कृष्णा ब्रीद, कोषाध्यक्ष आत्माराम गायकवाड, सुनील कुवरे, राजन देसाई,दिलीप ल सावंत, नारायण परब, पास्कोल लोबो, दिगंबर चव्हाण, सतीश भोसले यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमानंतर ८६ वर्षाची प्रदीर्घ परंपरा असलेल्या दैनिक कृषीवलला भेट देऊन मालक आणि प्रकाशिका सौ चित्रलेखा पाटील आणि मुख्य संपादक राजेंद्र साठे यांचा सन्मानचिन्ह प्रदान करून विशेष सत्कार करण्यात आला. सध्या देशात चाललेल्या परिस्थितीचा आढावा घेत लोकशाही टिकविण्यासाठी सोशल मीडियाचा किती महत्वाचा आहे आणि व्यक्त होण्यासाठी त्याचा प्रगल्भपणे कसा वापर करू शकतो याचे मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले.