
दैनिक स्थैर्य | दि. ३ डिसेंबर २०२३ | सातारा |
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला सर्वोत्तम असे संविधान दिले आहे. त्याच्या मूल्यांची जोपासना करण्यासाठी फार मोठी वैचारिक लढाई करण्याची गरज आहे, असे मत संविधान विश्लेषक, प्रसिद्ध विधीज्ञ अॅड. असीम सरोदे यांनी व्यक्त केले.
संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने ‘भारताचा अमृत काल’ या विषयसूत्रावर आयोजित थोरांच्या स्मृती व्याख्यानमालेत ते ‘भारतीय संविधान व मानवी हक्क’ या विषयावर बोलत होते.
कार्यक्रमास संबोधी प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिनकर झिंब्रे, उपाध्यक्ष रमेश इंजे, केशवराव कदम, अॅड. हौसेराव धुमाळ, प्रा. शांत साळवे, प्राचार्य डॉ. संजय कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
अॅड. असीम सरोदे म्हणाले, संविधान दिन प्रामुख्याने आंबेडकर अनुयायी साजरा करतात हे बरोबर नाही. सर्वच समाजाने हा दिन गौरवाने साजरा केला पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले आहे की, व्यक्ती कितीही मोठी असली तरी त्याची भक्ती, पूजा करू नका. ते लोकशाहीला घातक आहे. व्यक्तीस्तोमामुळे हुकूमशाही प्रवृत्ती बळावते. मात्र, देशात आज तसेच घडते आहे. भारतीय संविधान उध्वस्त करण्याचे प्रयत्न होत आहेत. संविधानाने व्यक्ती स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे. स्वातंत्र्य चळवळीने दिलेला धर्मनिरपेक्ष राष्ट्रवाद व लोकशाही जिवंत ठेवण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. समाजाचा बुद्धिजीवीवर्ग याबाबत उदासीन व वैफल्यग्रस्त झालेला आहे. हुकूमशाही प्रवृत्ती विरुद्ध बुद्धिजीवी वर्ग व समाजाने मायावी प्रयोगांना न भूलता, निर्भयपणे उभे राहिले पाहिजे. दिखाऊ स्वरूपाचा राष्ट्रवाद व विषारी धर्मांधता याचा मुकाबला केला पाहिजे. कायद्यापुढे सर्व समान आहेत. कट्टरतावाद हिंदू-मुस्लिम कोणत्याही रंगाचा असला तरी त्याला कडाडून विरोध केला पाहिजे.
देव-धर्म आणि शहीद सैनिक यांच्या नावाने मतदान करावे, असे बेकायदेशीर आवाहन करणार्या मोदी व शहा यांच्यावर कोणतीच कारवाई होत नाही. कारण भारताचा निवडणूक आयोग अर्धमेल्या ग्लानीग्रस्त अवस्थेत आहे. या देशात एक पंतप्रधान शीख समाजाचा तर एक राष्ट्रपती मुस्लिम अशा अल्पसंख्याक समाजाचे झालेले असताना ‘हिंदू खतरेमे’ कसा काय असू शकतो, असा सवाल त्यांनी यावेळी केला.
खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथे एकदिलाने जीवन जगणार्या हिंदू-मुस्लिम समाजात विष पसरविणारे हिंसक चेहरे ओळखण्याची ताकद नागरिकांना आत्मसात करावी लागेल.
लोकांप्रती संविधान समर्पित करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बुद्ध महावीर यांचा अहिंसा शांततेचा व बंधूभाव प्रेमाचा विचार मानणारे महात्मा गांधी यांची एकत्रित वैचारिक ताकदच कट्टरवादी हिंदुत्व, कट्टरवादी मुस्लिमवादी व इतर धर्मांधांना थांबवून लोकशाहीला संविधानिक नैतिकता व लोकशाही जोपासण्याचे काम करील, असा आशावाद शेवटी अॅड.असीम सरोदे यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर व संघटनांचे कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.