दैनिक स्थैर्य | दि. ३ जुलै २०२३ | सातारा |
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमचे अनेक सहकारी ज्यांना हजारो कार्यकर्त्यांनी शक्ती आणि पाठिंबा दिला. त्यांच्याकडून अपेक्षा होती की, ते महाराष्ट्रात संघटन मजबूत करतील, तसेच भाजपाने समाजा-समाजात आणि जाती-जातीत जे वेगळे वातावरण तयार केले आहे, त्याच्याशी संघर्ष करून सामाजिक ऐक्य आणि समतेचा प्रयत्न करतील. पण, काहींनी वेगळी भूमिका घेतली. महाराष्ट्रात त्यांनी अनेक वर्षे मोलाची कामगिरी केली. पण, तेच आज ज्या परिस्थितीशी आमचा संघर्ष आहे, त्यांच्यासोबत गेले. यामुळे नवीन कार्यकर्ता नाउमेद होवू नये म्हणून राज्याचा दौरा करत आहेत, असे खा. शरद पवार म्हणाले.
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आज खा. शरद पवार सातारा दौर्यावर आले असताना पत्रकारांशी बोलत होते.
पवार म्हणाले की, मी जिल्ह्यात येत असताना सकाळी गाडीत बसल्यापासून मोठ्या संख्येने कार्यकर्ते पाठिंबा द्यायला येत आहेत. त्यात सुमारे ८० टक्के तरुण आहेत. आम्ही लोकांनी जर कष्ट केले, या सगळ्यांना योग्य दिशा दिली, कार्यक्रम दिला तर येत्या दोन ते तीन महिन्याच्या प्रयत्नाने राज्यात राष्ट्रवादीला अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. याची सुरुवात सातार्यातून झाल्याचा आनंद आहे. गुरूपौर्णिमेच्या दिवशी एखादी महत्त्वाची मोहीम सुरू करायची असेल तर गुरूला स्मरण करून त्यांच्या समाधीस्थळापासून सुरूवात करण्यासाठी कराड येथे यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला नमन करून सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी मजबूत करायला कार्यकर्ता सहकार्य करेल. मी फिल्डवर निघालोय. अनेकांनी माझ्याशी दूरध्वनीवरून बातचीत केली. ते लवकरच भूमिका जाहीर करतील.
अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांची भेट घेतल्याबाबत पत्रकारांनी विचारले असता खा. पवार म्हणाले, अनेक वर्षे एकत्र काम केले आहे. सुप्रिया सुळे यांनीही अजित पवार यांची भेट घेतली. मतभिन्नता काय आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर त्यात संशय घेण्याचे कारण काय? असा सवाल केला.
कुणावरही अपात्रतेची कारवाई करणार नाही, पण याचा अर्थ ‘आशिर्वाद’ नाही. कारण मी जाहीररीत्या पक्षबांधणीसाठी बाहेर पडत आहे. तथापि, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांकडे याबाबत कायदेशीर कारवाई सुरू केली असेल.
ज्यांनी फारकत घेतली त्यांना ५ तारखेला पक्षाच्या बैठकीत घेणार काय? यावर बोलताना पवार म्हणाले की, त्याबाबत जयंत पाटील सर्वानुमते निर्णय घेतील, ते प्रदेशाध्यक्ष आहेत. तो त्यांचा अधिकार आहे. ते शिस्तबद्ध असून नियमानुसार काम करतील.
रामराजे आज या ठिकाणी उपस्थित नाहीत, याचे समाधान. अनेक कार्यकर्त्यांना भेटलो. त्यांच्याबद्दलची मते आज ऐकली. यानंतर कार्यकर्ते माझ्यावर का नाराज होते, याची कारणे मला समजली, असे शरद पवार म्हणाले.
अजित पवार यांना ‘सिंचन घोटाळा’ भोवला का? यावर खा. पवार म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. मात्र, ज्यांच्यावर आरोप केले त्यांनाच मंत्रीमंडळात घेतल्यानंतर मोदींनी केलेले आरोप वास्तव नव्हते. राष्ट्रवादीच्या दृष्टीने मोदींचे त्यावेळचे वक्तव्य आणि आजची स्थिती पाहिल्यानंतर या सगळ्यांना निर्दोषत्व द्यायची भूमिका देशाच्या नेतृत्वाने घेतल्याचे खा. पवार म्हणाले.
हे सर्व लोक गेल्याचा दु:ख अजिबात वाटत नाही. कारण माझा मतदार आणि सर्वसामान्य माणसांवर विश्वास आहे. पक्षबांधणी म्हणजे ‘शिवधनुष्य’ वगैरे काही नाही. लोकांच्यात जाणे, त्यात कंटाळा नाही, असे पवार शेवटी म्हणाले.