स्थैर्य, दि.१८: गेल्या काही दिवसांमध्ये राज्याच्या अनेक भागांमध्ये परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. मात्र या अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मराठवाड्याचा दोन दिवसीय दौऱ्यावर असणार आहेत. 18 आणि 19 ऑक्टोबर असा दोन दिवस हा दौरा असणार आहे.
दरम्यान या दोन दिवसांमध्ये शरद पवार हे तुळजापूर, उमरगा, औसा, परांडा, उस्मानाबाद येथे भेट देतील. तसेच पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करतील. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसामुळे हाता तोंडाशी आलेला घास गेल्याने बळीराजा अडचणीत सापडला आहे.
शरद पवार यांनी यापूर्वीही निसर्ग चक्रीवादळानंतर कोकण दौरा केला होता. या दौऱ्याचा आढावा पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिला होता. यानंतर राज्य सरकारने नुकसान भरपाईसंबंधी निर्णय घेतला होता. त्यामुळे आता शरद पवार यांच्या मराठवाडा दौऱ्यानंतर राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई मिळते हा हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.