दैनिक स्थैर्य । दि. ३० सप्टेंबर २०२१ । कोळकी । राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ओबीसी सेलच्या सातारा जिल्हा अध्यक्षपदाच्या माध्यमातून जिल्हास्तरावर काम करण्याची संधी विधानपरिषदेचे सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिली आहे. ना. श्रीमंत रामराजे व श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी काळामध्ये सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व पक्षाचा ओबीसी सेल बळकट करण्यासाठी कार्यरत राहू, असे आश्वासन मिलिंद नेवसे यांनी दिले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सातारा जिल्हा ओबीसी सेलचे अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल कोळकी ग्रामपंचायतीच्यावतीने मिलिंद नेवसे यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना मिलिंद नेवसे बोलत होते. यावेळी सरपंच सौ. विजया नाळे, उपसरपंच संजय कामठे, ग्रामसेवक दडस व ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य उपस्थित होते.
यावेळी बोलताना मिलिंद नेवसे म्हणाले की, विधान परिषदेचे सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटणचे आमदार दीपक चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर व सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ओबीसी सेलच्या जिल्हाध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांचा मी ऋणी आहे. या पदाच्या माध्यमातून आगामी काळामध्ये जिल्ह्यात पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी कार्यरत राहणार आहे.
मिलींद नेवसे यांच्या रुपाने विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व राजे कुटुंबीयांनी योग्य व्यक्ती सातारा जिल्हा ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष पदी निवडली असून आगामी काळामध्ये ओबीसी बांधवांसह सर्वांना बरोबर घेऊन मिलिंद नेवसे कार्यरत राहतील असा विश्वास, कोळकी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. विजया नाळे यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये किंवा राजे गटामध्ये जर एकनिष्ठपणे काम केले तर त्याचे फळ हे मिळतेच. हेच आपल्याला मिलिंद नेवसे यांच्या रूपात बघायला मिळाले आहे. गेली अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व राजे गटाशी एकनिष्ठ राहिल्यामुळे मिलिंद नेवसे यांना सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ओबीसी सेलच्या जिल्हाध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळाली आहे व या संधीचेही ते नक्कीच हे सोने करतील, असे कोळकी ग्रामपंचायतीचे उपसरपंच संजय कामठे यांनी यावेळी सांगितले.
कोळकी ग्रामपंचायतीचे सदस्य शिवा भुजबळ, विकास नाळे यांनी अभिनंदनपर मनोगत व्यक्त केले तर प्रास्ताविक व आभार सदस्य अक्षय गायकवाड यांनी मानले.