दैनिक स्थैर्य | दि. 30 जानेवारी 2024 | फलटण | लोकसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी दि. 01 फेब्रुवारी रोजी कार्यकर्त्यांचा जाहीर मिळावा कोळकी येथील अनंत मंगल कार्यालय येथे बोलावला आहे. यामध्ये सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आलेल्या पोस्टवर कोणत्याही नेत्यांचे फोटो नसल्याने आगामी काळामध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर वेगळी भूमिका घेत आहेत का ? असा प्रश्न उपस्थित राहत आहे.
राज्यामध्ये ज्या राजकीय परिस्थिती बदलल्या गेल्या त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सोबत जाण्याचा निर्णय विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी घेतला होता. परंतु सत्तेमध्ये सहभागी होऊन काही महिने झाले असताना सुद्धा कार्यकर्त्यांची विविध कामे मार्गी लागली जात नाहीत; त्यामुळे व आगामी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये माढा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे येत नसल्याची चर्चा सुरू झाल्याने आगामी परिस्थितीमध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सोबतच राहायचे की काही वेगळा निर्णय घ्यायचा ? याबाबत कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याचे समोर येत आहे.
श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची गेल्या 30 वर्षांमध्ये जिल्ह्याच्या राजकारणावर मजबूत पकड आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सातारा जिल्ह्याचे नेते म्हणून श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची ओळख आहे. पूर्वी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची ओळख होती. परंतु गेल्या काही महिन्यांपूर्वी राज्यांमध्ये सत्तानाट्य घडत जे काही बदल झाले; त्यामध्ये शरद पवार यांची साथ सोडून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय श्रीमंत रामराजे यांनी घेतला होता. आगामी लोकसभेच्या दृष्टीने आता श्रीमंत रामराजे भूमिका बदलत पुन्हा शरद पवारांकडे जाणार की अन्य कोणता मार्ग निवडणार ? याकडे आता तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेले आहे.