स्थैर्य, मुंबई, दि १३: मराठा आरक्षणावर अद्यापही कोणताही निर्णय झालेला नाही. या विषयांवरुन राज्यातील वातावरण तापलेले दिसत आहे. मराठा आरक्षणाच्या बाबतीत आपली बाजू मांडण्यात राज्य सरकार कमी पडतेय असा आरोपही सातत्याने केला जात आहे. आता भाजपकडून पुन्हा एकदा या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी-काँग्रेसवर टीकास्त्र साधण्यात आले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी राष्ट्रवादी-काँग्रेसवर टीकास्त्र साधले आहे.
‘मराठा समाजाच्या नावाने राष्ट्रवादी-काँग्रेसने महाराष्ट्रात एवढी वर्ष राजकारण केले. पण मराठा समाज कधीही आपल्या पुढे जाणार याचीच खबरदारी राष्ट्रवादी-काँगेस पक्षाने आजपर्यंत घेतली!’ असे म्हणत चंद्रकांत पाटलांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसला धारेवर धरले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी ही टीका केली आहे.
तुम्हाला केवळ तुमच्या राजकारणाची काळजी
पुढे चंद्रकांत पाटील म्हणाले की, ‘तुम्हा प्रस्तापितांना गरीब मराठ्यांना कधी आरक्षण द्यायचेच नव्हते. 15 वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार राज्यात होते. मात्र तुम्हाला केवळ तुमच्या राजकारणाची काळजी होती, मराठ्यांची नाही. मराठा समाजाची मते हक्काने घ्यायची, पण त्यांना आहे तसेच राहू द्यायचे, हेच तुमचे धोरण!’ असा टोलाही चंद्रकांत पाटलांनी लगावला आहे.
आतातरी ठाकरे सरकारने योग्य पावले उचलावी
‘मराठा समाजाला आरक्षणासाठी मी आणि स्वतः देवेंद्रजी सरकारला सहकार्य करायला तयार आहोत. मराठा समाजाचे कल्याण व्हावे म्हणून भाजपा सदैव सहकार्याच्या भूमिकेत आहे. आतातरी ठाकरे सरकारने संवेदनशीलता दाखवत आरक्षणासाठी योग्य पावले उचलावी व आरक्षण मिळेपर्यंत इतर उपलब्ध पर्याय लागू करावे.’ असेही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.