
स्थैर्य, गिरवी, दि. २० सप्टेंबर : फलटण तालुक्याच्या पश्चिम भागातील गिरवी आणि परिसरातील गावांमध्ये सध्या नवरात्र उत्सवाची तयारी मोठ्या उत्साहात सुरू झाली आहे. या उत्सवाची पूर्वापार चालत आलेली प्रथा म्हणून घरादाराच्या स्वच्छतेची आणि साफसफाईची लगबग दिसून येत असून, ग्रामीण भागात उत्सवाचे मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे.
नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने घरातील कपडे, सतरंजी, वाकळी आणि इतर वापराचे साहित्य धुण्यासाठी गावातील महिलांची ओढे, नाले आणि तलावांच्या काठावर गर्दी होत आहे. या कामात घरातील पुरुष मंडळीही महिलांना मदत करताना दिसत आहेत. केवळ घरेच नव्हे, तर शेतकरी आपल्या गाई-गुरांच्या गोठ्यांचीही स्वच्छता करत आहेत. ही परंपरा प्राचीन काळापासून नवरात्र उत्सवाचा एक अविभाज्य भाग मानली जाते.
गिरवी परिसरातील गिरवी, तिरकवाडी, धुमाळवाडी, निरगुडी, बोडकेवाडी, सासकल, भाडळी आणि दुधेबावी या आठ गावांमध्ये नवरात्र उत्सव डोंगरमाथ्यावरील भवानीमाता मंदिरात मोठ्या जल्लोषात आणि धार्मिक वातावरणात साजरा केला जातो. या उत्सवात सर्व गावांतील भाविक मोठ्या श्रद्धेने सहभागी होतात.
याचबरोबर, गिरवी गावातून तुळजापूरला पायी दिंडी घेऊन जाण्याची परंपराही गेल्या पंचवीस वर्षांपासून अखंडितपणे सुरू आहे. गिरवीतील तुळजाभवानी भक्त श्री. रणजित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली निघणाऱ्या या पायी वारीमध्ये फलटण, साखरवाडी, जिंती, निरगुडी, सासकल यांसह परिसरातील अनेक गावांमधील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होऊन आई तुळजाभवानी मातेप्रती आपली श्रद्धा व्यक्त करतात.