११ सप्टेंबरला देशभरात बँकांचा संप; ‘या’ महत्त्वाच्या सेवा ठप्प होण्याची शक्यता

पाच दिवसांचा आठवडा लागू करण्यासह प्रलंबित मागण्यांसाठी बँकांनी संपाची हाक दिली असून बँकिंग सेवांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

स्थैर्य, सातारा, दि. ०७ सप्टेंबर : आठवड्यात ५ दिवसांचा कामकाज नियम लागू करण्यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने (UFBU) शुक्रवारी, ११ सप्टेंबर रोजी देशभरात एकदिवसीय बँक संपाची हाक दिली आहे. बँक युनियन्स आणि इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) यांच्यात झालेली बैठक निष्फळ ठरल्याने हा संप निश्चित झाला आहे. या संपामुळे स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ इंडिया, युनियन बँक आणि कॅनरा बँक यांसारख्या प्रमुख सरकारी बँकांच्या शाखांमधील कामकाज प्रभावित होणार आहे.

रोख व्यवहार आणि चेक क्लिअरन्सवर परिणाम

संपाच्या काळात बँक शाखांमधील रोख व्यवहार, चेक क्लिअरन्स आणि पासबुक प्रिंटिंग यांसारख्या सेवा ठप्प होण्याची शक्यता आहे. बहुतांश खाजगी बँकांचे व्यवहार सुरळीत राहतील; तरीही ग्राहकांनी आपली महत्त्वाची बँकेची कामे आधीच उरकून घ्यावीत असे आवाहन करण्यात आले आहे. बँक शाखांचे काम प्रभावित होणार असले तरी एटीएम (ATM), मोबाईल बँकिंग आणि ऑनलाइन इंटरनेट बँकिंग सेवा कार्यरत राहतील.

बेमुदत आंदोलनाचा इशारा

तोडगा न निघाल्यास युनियनने २८ ते ३० सप्टेंबर दरम्यान ३ दिवसांचा संप आणि २६ ऑक्टोबरपासून बेमुदत संपाचा इशारा दिला आहे. यामुळे ऐन सण-उत्सवाच्या काळात आर्थिक व्यवहार खोळंबण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

 

 

Back to top button
Don`t copy text!