
दैनिक स्थैर्य | दि. २७ जानेवारी २०२५ | फलटण |
फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी महाविद्यालय, फलटण येथील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, राज्यशास्त्र विभाग आणि निवडणूक साक्षरता क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच तहसील कार्यालयाच्या (निवडणूक शाखा) सहकार्याने २५ जानेवारी २०२५ रोजी राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते.
प्रभातफेरी मतदान जनजागृती या संकल्पनेवर आधारित होती. सकाळी ७:३० वाजता महाविद्यालयातून प्रभातफेरीला सुरुवात झाली आणि ती तहसील कार्यालयाच्या दिशेने मार्गस्थ झाली. तहसील कार्यालयात तहसीलदार अभिजीत जाधव यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यानंतर प्रभातफेरी महात्मा फुले चौक, गजानन चौक, आंबेडकर चौक, शिवाजी चौक, मोती चौक, पृथ्वी चौकमार्गे पुन्हा महाविद्यालयात परतली.
गजानन चौक, आंबेडकर चौक आणि पृथ्वी चौक येथे विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृतीवर आधारित प्रभावी पथनाट्य सादर केले.
महाविद्यालयात सकाळी १०:२० वाजता प्रभातफेरीचे आगमन झाले. यानंतर महाविद्यालयाच्या परिसरात राष्ट्रीय मतदार प्रतिज्ञा घेतली. या कार्यक्रमात महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, आणि विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
प्रा. गिरीश पवार यांनी प्रभातफेरीची संपूर्ण माहिती प्राचार्य प्रो. डॉ. पी. एच. कदम यांना दिली. प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना मतदानाचे लोकशाहीतले महत्त्व समजावून सांगितले आणि लोकशाही मूल्यांची जोपासना करण्याचे आवाहन केले. कला शाखाप्रमुख प्रो. डॉ. अशोक शिंदे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून आभार व्यक्त केले.
हा उपक्रम अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रो. डॉ. टी. पी. शिंदे यांच्या संकल्पनेतून, प्रा. गिरीश पवार यांच्या नेतृत्वाखाली तसेच प्रा. अक्षय अहिवळे आणि प्रा. प्रियांका शिंदे यांच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पडला.
एकूण ८६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेल्या या प्रभातफेरीने लोकशाहीचा संदेश देत मतदानाबद्दल जागृती निर्माण केली.