राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेचा ’शिक्षा गौरव पुरस्कार’ पुण्यातील ’टॅस’ शाळेला

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, पुणे, दि. २४: राष्ट्रीय पातळीवर शिक्षण क्षेत्रात व विशेषत: शालेय शिक्षणासाठी काम करणार्‍या ’सेंटर फॉर एयुकेशन ग्रोथ अँड रिसर्च’ या संस्थेतर्फे देण्यात येणारा आणि अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा चौदावा ’राष्ट्रीय शिक्षा गौरव पुरस्कार’ पुण्याच्या ’द अकॅडमी स्कूल’ (टॅस) ला जाहीर झाला असल्याची माहिती ’टॅस’ च्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मैथिली तांबे यांनी दिली.

’द अकॅडमी स्कूल’ ही ग्रामोदय ट्रस्ट च्या माध्यमातून चालवण्यात येणारी आयसीएसई शाळा असून पुण्यात डांगे चौक परिसरात 5 एकर जागेवर शाळेचे भव्य संकुल उभे आहे. पुण्याच्या शैक्षणिक क्षितिजावर अल्पावधीतच आपली वेगळी ओळख ’टॅस’ ने निर्माण केली असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील याची दखल शिक्षण क्षेत्राकडून घेतली जात आहे.

’टॅस’ आपल्या अध्ययन पद्धतीत सातत्याने नवनवीन प्रयोग आणि सुधारणा करण्यासाठी प्रसिद्ध असून अगदी कोरोनाच्या काळात ऑनलाईन पध्दतीत देखील शाळेने बाहेरच्या देशातील शिक्षण पद्धतीनुसार अनुकूल बदल घडवून आणले आहेत. मागच्या वर्षी अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जाणारे राष्ट्रीय पातळीवरचे ’द इकॉनॉमिक टाइम्स’ आणि ’एयुकेशन वर्ल्ड’ चे पुरस्कार मिळाले आहेत.

फिनलँडची  रचनावादी शिक्षणपद्धती ही संपूर्ण जगभरात नावाजलेली असून जगातील सर्वोत्तम म्हणून ओळखल्या जाणार्‍या या शालेय शिक्षण  पद्धतीमध्ये युक्तिवाद करता येणे, समस्यापूर्ती कौशल्य आत्मसात करणे, जीवनानुभव विषयांशी जोडणे, संवाद कौशल्य अशा शैक्षणिक उद्दिष्टांवर जोर आहे . याचा फायदा ’टॅस’ च्या विद्यार्थ्यांना नक्कीच होईल असा विश्वास डॉ. तांबे यांनी व्यक्त केला.

’टॅस’ चे व्यवस्थापन हे शिक्षणाकडे एक ध्येय आणि समजाप्रति असलेली बांधिलकी म्हणून बघते. कोरोना लॉकडाऊनच्या कठीण काळात पालकांना आर्थिक भार पडणार नाही याची काळजी संस्थेने घेतली. .इतर खाजगी शाळांप्रमाणे पालकांचे आर्थिक शोषण होणार नाही याची काळजी संस्थेच्या वतीने घेण्यात येते. शाळांची फी योग्य प्रमाणात आकारली जाते. विशेष म्हणजे शाळेत प्रवेश घेताना आकारलेली फी ही दहावीपर्यंत कधीच वाढवण्यात येत नसल्याने ’टॅस’ पालकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे.

याबाबत ’टॅस’ च्या विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. मैथिली तांबे यांना विचारले असता त्या म्हणाल्या  शाळेच्या व्यवस्थापनाला दीर्घकालीन शैक्षणिक व सामाजिक योगदानाची पार्श्वभूमी आहे.पालकांना त्यांच्या पाल्याच्या शिक्षणासाठी दहावीपर्यंत एकूण किती खर्च येणार आहे, त्याबाबत त्यांना एक निश्चित हमी देतो . जेणेकरून शिक्षणाबाबत पालक निश्चिंत राहतील व त्यांचे इतर आर्थिक नियोजन सुकर होईल.

शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक आणि कर्मचारीवर्ग घेतले असलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांसाठी डॉ. तांबे यांनी यावेळी आभार मानले.


Back to top button
Don`t copy text!