मायणीत राष्ट्रीय मार्गाचे कामकाज बंद पाडले


स्थैर्य, सातारा, दि. 7 डिसेंबर : मायणी ता. खटाव येथून जाणार्‍या भिगवण मिरज राष्ट्रीय मार्गाचे रस्ता रुंदीकरणाचे काम मागण्या मान्य होईपर्यंत सुरु न करण्याची मागणी करत ग्रामस्थांनी बंद पाडले.

मायणी येथील अत्यंत रहदारीच्या असलेल्या चांदणी चौकामध्ये मध्यभागी सर्कल, बस थांबा, फुटपाथ व गावभागात रस्त्याच्या दोन्ही बाजूला पथदिवे असणे गरजेचे आहे. अशा प्रकारची मागणी मायणीकर ग्रामस्थांनी ग्रामपंचायत व मायणी पत्रकार संघाकडे केली होती. या पार्श्वभूमीवर मायणी ग्रामपंचायतच्या वतीने काल सोशल मीडियाच्या माध्यमातून सदर कामाच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी नागरिक व ठेकेदार यांच्यात चर्चा करून त्यातून योग्य तो मार्ग काढण्यासाठी बैठक बोलावली होती. या बैठकीत ठेकेदाराने योग्य ती माहिती न दिल्याने सदर मागण्यांची लेखी पूर्तता होईपर्यंत सदर काम करू नये अशा प्रकारचा पवित्रा मायणीकर नागरिकांनी घेऊन सदर काम बंद पाडले.

कांही वर्षांपूर्वी झालेल्या मल्हारपेठ-पंढरपूर राज्य मार्ग दरम्यान स्वतः तहसीलदार यांनी या राज्यमार्ग आणि राष्ट्रीय मार्गाचे अतिक्रमण काढून टाकले होते. त्यावेळी काढलेले अतिक्रमण पाहता आता सुरू असलेला राष्ट्रीय मार्ग हा त्या तुलनेत अतिशय छोटा आहे. शिवाय राज्य मार्ग आणि राष्ट्रीय मार्ग येथील चांदणी चौकात एकत्र येत असल्याने तेथे सर्कल, बस थांबा, फुटपाथ व रस्त्याच्या दोन्ही बाजूला पथदिवे आहेत की नाहीत याबाबतीतही ठेकेदार लोकांना कोणतीही माहिती देत नाहीत. ग्रामपंचायतीने वारंवार त्यांना त्याबाबत लेखी पाठपुरावाही केला आहे. मात्र त्यांनाही व्यवस्थित माहिती दिली जात नाही. या राज्य आणि राष्ट्रीय महामार्गाला मोराळे रस्ता, मरडवाक रस्ता, अनफळे रस्ता, शेडगेवाडी रस्ता जोडला असून त्यामुळे अनेक गावे आणि खेडी जोडलीअसल्यामुळे चांदणी चौक येथे मोठ्या प्रमाणात गर्दी व वाहनांचे ट्रॅफिक जाम होत असताना दिसते.

मल्हारपेठ-पंढरपूर या राज्यमार्गाला शाळा, कॉलेज, महाविद्यालये असल्याने हजारो विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते त्यामुळे या चांदणी चौक परिसरामध्ये राष्ट्रीय महामार्ग मोठा होणे अपेक्षित आहे. तरच भविष्यात येणार्‍या अडचणी दूर होतील अन्यथा अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल. ठेकेदाराने चांदणी चौक येथे राष्ट्रीय मार्गावर कोणकोणत्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्याचे नियोजन ग्रामपंचायत व ग्रामस्थांना दाखेषावे व नंतरच हा मार्गाचे काम सुरू करावे अशी चर्चा करून नागरिकांनी सदरराष्ट्रीय मार्गाचे काम बंद ठेवून समस्त ग्रामस्थांच्या वतीने सदर मार्गाचे व्यवस्थापकांना ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.

सदर चर्चेत मायणी ग्रामपंचायतीचे सरपंच प्रतिनिधी रणजीत माने, उपसरपंच दादासाहेब कचरे, मार्केट कमिटीचे संचालक स्वप्रिल घाडगे, मायणी पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश जाधव, डॉ. विकास देशमुख, युवराज भिसे, मन्सूर नदाफ, किशोर माळी, दत्ता कचरे, विकास सकट, अतुल सुरमुख, अझरुद्दीन नदाफ, मोहन दगडे, नितीन पडळकर, राजू कचरे, सुरज जाधव इब्राहिम तांबोळी आदी प्रमुख कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


Back to top button
Don`t copy text!