स्थैर्य, सातारा, दि.२४: सातारा येथे दि. 14 मार्च 2021 रोजी झालेल्या भटक्या विमुक्त जमाती संघटनेच्या राज्य कार्यकारिणीमध्ये 31 ऑगस्ट 2021 रोजी सोलापूर येथे राष्ट्रीय महाधिवेशन आयोजित करण्याचा निर्णय झाला आहे. भटक्या विमुक्त जमातींची तिसरी यादी या बैठकीत फेटाळण्यात आली. यापुढे संघटना भटक्या विमुक्त या शब्दाचा वापर करणार नाही. त्यामुळे संघटनेचे नाव बदलण्यात आले आहे. यापुढे भारतीय आदिवासी जमाती संघम या नावाने संघटना कार्य करील. या अधिवेशनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह विविध मान्यवरांना निमंत्रण देणार असल्याची माहिती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष लक्ष्मण माने यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते पुढे म्हणाले, 1871च्या गुन्हेगार जमाती कायद्याला 31 ऑगस्ट 2021 रोजी 150 वर्षे पूर्ण होतात. हा कायदा 1952 साली दुरुस्त करण्यात आला. तद्नंतर त्याचे रुपांतर संशयित गुन्हेगारी जमाती कायद्यामध्ये करण्यात आला. हा कायदा संपूर्ण देशासाठी होता. देशभर गुन्हेगारी जमातीच्या वसाहती केल्या होत्या. तीन तारांच्या कंपाऊंडमध्ये या चिन्हांकित जमाती डांबण्यात आल्या होत्या. म्हणजेच खुल्या कारागृहात ठेवण्यात आल्या होत्या. 80 वर्षे इंग्रज सरकारने जन्मत:च गुन्हेगार ठरवून त्यांना गुन्हेगार बनवले होते. देशभर या कायद्याने अस्तित्वात असलेल्या जमाती, अनुसूचित जमाती किंवा अनुसूचित जाती यांच्या याद्यांमध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र, गुजरात आणि तामिळनाडूमध्ये मात्र तिसरी सूची करण्यात आली आहे.
लक्ष्मण माने पुढे म्हणाले, राष्ट्रीय अधिवेशनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सिताराम येच्युरी, सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्यासह विविध मान्यवरांना निमंत्रण देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.