स्थैर्य, दि.७: कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनावर बॉलिवूडमधील दिग्गजांनी बाळगलेल्या मौनावर ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी कडाडून टीका आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आता बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते नसरुद्धीन शाह यांनी समर्थन दिले आहे. त्यांची एक मुलाखत सध्या सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यात ते शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ वक्तव्य करत असल्याचे दिसत आहे.
या मुलाखतीत ते म्हणाले, ‘आमच्या चित्रपटसृष्टीतील मोठमोठे दिग्गज मौन धारण करुन बसले आहेत. कारण त्यांना भीती वाटते की जर त्यांनी काही मत व्यक्त केले, तर ते खूप काही गमावू शकतात. अहो, पण या लोकांनी एवढा अमाप पैसा कमावला आहे की, त्यांच्या पुढील सात पिढ्या बसून खाऊ शकतात. तर तुम्ही किती गमवाल?,’ असा प्रश्न नसरुद्दीन शाह यांनी उपस्थित केला आहे.
‘शांत बसून राहणे हे अन्याय करणाऱ्याला मदत केल्यासारखे आहे’
नसीरुद्दीन पुढे म्हणतात, ‘जेव्हा सगळे उध्वस्त झाले असेल तेव्हा तुमच्या शत्रुंचाही आवाज येणार नाही. तुम्हाला तुमच्या मित्रांची शांतता पण जास्त त्रास देईल. मला काही फरक पडत नाही. असे बोलूनही चालणार नाही. जर शेतकरी कडाक्याच्या थंडीत ठाण मांडून बसले आहेत. तर मला काही फरक पडत नाही असे बोलू शकता. परंतु मला खात्री आहे की, शेतकऱ्यांचे आंदोलन वाढेल तीव्र होईल. आणि सामान्य जनताही यामध्ये सहभाग घेईल. शांत बसून राहणे हे अन्याय करणाऱ्याला मदत केल्यासारखे आहे,’ असे नसीरुद्दीन शाह यांनी म्हटले आहे.
‘कुणी हिंदी चित्रपट आवडत नाही असे म्हटले तर त्याला देशद्रोही म्हटले जाते’
शाह यांनी देशाच्या सद्य वातावरणाबद्दल बोलताना म्हटले, ‘जर आजच्या काळात आपण भारतीय ट्राफिक नियमांचे पालन करत नाही, असे म्हटले तर तुम्हाला एंटी नॅशनल ठरवले जाईल. जर आपण हिंदी चित्रपट आवडत नाही, असे म्हटले तर तुम्हाला देशद्रोही ठरवून पाकिस्तानात निघून जा, अशी धमकी दिली जाईल,’ असे शाह म्हणाले.
‘शाहीन बाग आंदोलन संपवण्यासाठी लॉकडाउन लावला’
लॉकडाउनवरही नसीरुद्दीन शाह यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, ‘कोविड दरम्यान दोन ते चार तासांचा कालावधी देऊन लॉकडाउन जाहीर करण्यात आला. ते न्याय्य होते की नाही हे माहित नाही. प्रत्येकाचे स्वतःचे मत आहे. पण शाहीन बागचे आंदोलन पांगवणे आवश्यक होते. ही एक चांगली खेळी होती आणि यात सरकारला यश आले. आता बर्ड फ्लू पसरला आहे. माझ्या मते, शेतक-यांचे आंदोलन पांगवण्यासाठी सरकार आता हा मुद्दा अमंलात आणेल.’
‘लव्ह जिहादचा तमाशा सुरु आहे’
शाह पुढे म्हणाले की, ‘यूपीमध्ये लव्ह जिहादचा तमाशा चालू आहे. पहिली गोष्ट म्हणजे ज्या लोकांनी हे शोधून काढले आहे, त्यांनाच या गोष्टीचा अर्थ काय आहे हे माहित नाही. दुसरे म्हणजे, कुणी एवढा मूर्ख नसावा की एकेदिवशी हिंदूपेक्षा मुस्लिमांची संख्या या देशात जास्त होईल, असे त्याला वाटत असावे. यासाठी मुस्लिमांना किती वेगाने मुले जन्माला घालावी लागतील? मला वाटते की या सर्व फसव्या गोष्टी आहेत. यावर कुणालाही विश्वास बसणार नाही. हा जो लव्ह जिहादचा तमाशा मांडला आहे, तो फक्त हिंदू आणि मुस्लिमांमधील सामाजिक संवाद थांबविण्यासाठी केला गेला आहे. भेटीगाठीच बंद झाल्या तर लग्नाचा विषयच संपेल. हा प्रयत्न सुरु आहे,’ असे परखड मत त्यांनी व्यक्त केले आहे.