नारायण सुर्वे सामान्यांपर्यंत पोहोचलेले पहिले युगप्रवर्तक कवी

प्रा. इंद्रजीत भालेराव; मराठी भाषा गौरव दिन व मराठी भाषा पंधरवड्याचे उद्घाटन


सातारा – मराठी भाषा पंधरवड्याचे उद्घाटन करताना प्राध्यापक इंद्रजीत भालेराव, नियोजन सभापती अशोक शेडगे, किशोर बेडकीहाळ,नंदकुमार सावंत व अ‍ॅड. चंद्रकांत बेबले)

स्थैर्य, 28 फेब्रुवारी, सातारा : संथ,शांत,प्रभावी व आत्मविश्वास पूर्ण वास्तवाचे भान असणारे तसेच विसाव्या शतकाच्या उत्तरार्धावर ज्यांचा प्रभाव होता. असे ज्येष्ठ कवी नारायण सुर्वे हे सामान्यांपर्यंत पोहोचलेले पहिले युगप्रवर्तक कवी असल्याचे मत ज्येष्ठ लेखक,कवी प्रा. इंद्रजीत भालेराव यांनी व्यक्त केले.

नगरपालिका व महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा शाहूपुरी (सातारा) यांच्यावतीने मराठी भाषा गौरव दिन व मराठी भाषा पंधरवड्याचे उद्घाटन प्रा. भालेराव यांच्या हस्ते नगर वाचनालय येथील पाठक हॉल येथे झाले. नारायण सुर्वे माणूस आणि कवी या विषयावरील व्याख्यानावर यावेळी ते बोलत होते.

यावेळी सातारा नगरपालिका नियोजन सभापती अशोक शेडगे, मसाप शाहूपुरी शाखेचे अध्यक्ष नंदकुमार सावंत, ज्येष्ठ लेखक किशोर बेडकीहाळ, डॉक्टर राजेंद्र माने, कार्याध्यक्ष अ‍ॅड. चंद्रकांत बेबले, प्रमुख कार्यवाह व जिल्हा परिषदेचे सदस्य अजित साळुंखे, प्राचार्य यशवंत पाटणे, डॉक्टर संदीप श्रोत्री, श्याम बडवे, बाबुराव शिंदे, रविंद्र भारती, संजय माने, सचिन सावंत उपस्थित होते.

प्रा. भालेराव म्हणाले की, मराठी राजभाषा दिन आणि मराठी भाषा पंधरवड्याचे पहिले पुष्प ज्येष्ठ कवी नारायण सुर्वे यांच्यावरील व्याख्यानाने होत असल्याने आजचा दिवस खूप खास आहे. कवी कुसुमाग्रज यांनी नारायण सुर्वे यांना मानसपुत्र मानले होते. नारायण सुर्वे यांचे लहानपण अत्यंत हालाखीत गेले. रस्त्यावर सोडून दिलेल्या नारायण सुर्वे यांना एका गिरणी कामगारांने सांभाळले परंतु काही कारणाने ज्यांनी त्यांचा सांभाळ केला त्या पालकांनी नारायण सुर्वे दहा वर्षाचे असताना त्यांना सोडून गेले. सुर्वे लहानपणापासूनच हॉटेल, कापड गिरणी कामगार असे काम करत मोठे झाले. शिक्षण घेऊन सेवक शिक्षक म्हणूनही काही काळ त्यांनी काम केले. शाहीर अमर शेख, अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा पगडा त्यांच्यावर होता. कविता लेखन करताना वाड्मयीन विचारांचे सखोल वाचन करून त्यांनी कामगारांच्याच नाही तर देशासमोर आणि जगासमोरच्या प्रश्नांचा विचार त्यांनी कवितेतून केला. 1955 ते 1995 या चाळीस वर्षाचा लेखन काळामध्ये त्यांनी माझे विद्यापीठ,गिरणीची लावणी, डोंगरी शेत, पोस्टर 145 कविता त्यांनी लिहल्या. वास्तवाचे भान असणारे प्रेम कविता ही त्यांनी लिहिल्या दलित कवितांची सुरुवात ही सुर्वे यांनी केले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

डॉक्टर राजेंद्र माने म्हणाले,  मराठी भाषा पंधरावडा साजरा करण्याची संकल्पना असणारी एकमेव शाखा म्हणजे शाहूपुरी शाखा आहे ती गेले पंधरा वर्षे सातत्याने हा पंधरावा साजरा करत आहे. ज्येष्ठ कवी नारायण सुर्वे यांनी श्रमिक शोषितांचा आवाज आपल्या कवितेतून समोर आणला असे यावेळी त्यांनी सांगितले. आभार मसाप शाहूपुरी शाखेचे अध्यक्ष नंदकुमार सावंत यांनी मानले.

आज कादंबरी लेखन व कार्यशाळा..

नगर वाचनालयातील पाठक हॉल येथे आज 1 मार्च रोजी सकाळी 9 ते 1 वाजताच्या दरम्यान ज्येष्ठ कादंबरीकार डॉ. बाळासाहेब लबडे यांचे कादंबरी विषयक मार्गदर्शन व कार्यशाळा होणार आहे. या कार्यक्रमासाठी महिला व बालकल्याण सभापती सौ. मोनिका घोरपडे, उपसभापती सौ. सुजाता गिरीगोसावी, माजी नगरसेवक रवींद्र भारती, ज्येष्ठ पत्रकार मुकुंद फडके व संपादक हणमंत पाटील उपस्थित राहणार आहेत.


Back to top button
Don`t copy text!